बंद उद्योगांना मिळणार अभय

- उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
बंद उद्योगांना मिळणार अभय
USER

मुंबई। प्रतिनिधी

राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

प्रस्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी सुभाष देसाई यांनी आज राज्यभरातील उद्योजकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, अंबरनाथ, तळोजा, अंबड, सिन्नर आदी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी आणो औद्योगिक संघटनांनी भाग घेऊन काही सूचना केल्या.

विविध उद्योजक संघटनांनी केलेल्या या सर्व सूचनांची दखल घेऊन नवी योजना तयार करण्यात यावी, असे निर्देश सुभाष देसाई यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

विशेष अभय योजनेमध्ये बंद असलेल्या उद्योग घटकांकडे शासकीय देणी थकित असल्यास त्या रक्कमेवरील दंड आणि व्याज पूर्णपणे माफ करून औद्योगिक मालमत्ता नवीन खरेदीदारांकडे हस्तांतरित करण्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

यापूर्वी २०१६मधील अशा अभय योजनेचा २८७ उद्योगांनी लाभ घेतला आहे. प्रस्तावित विशेष अभय योजना उद्योगस्नेही असेल. रोजगार गमावलेल्या कामगारांना या योजनेद्वारे रोजगार उपलब्ध होईल. देशातील इतर राज्य देखील या योजनेचे अनुकरण करतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी, सिन्नर तालुका औद्योगिक सहकरी वसाहतीचे संचालक नामकर्ण आवारे, पिंपरी चिंचवड औद्योगिक संघटनेचे कर्याध्यक्ष गोविंद पानसरे, विदर्भ औद्योगिक संघटनेचे सुरेश राठी, लघु, मध्यम उद्योग संघटनेचे प्रदीप पेशकार यांनी विविध सूचना केल्या.

या बैठकीला उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, सहसचिव संजय देगांवकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com