Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारामकुंडाचे काँक्रिट काढण्याची स्मार्ट सिटीची तयारी

रामकुंडाचे काँक्रिट काढण्याची स्मार्ट सिटीची तयारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रामकुंडातील काँक्रिट मुद्यावरून स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. गोदावरीप्रेमींनी त्रिस्तरीय समितीच्या सूचनेनुसार काँक्रिट काढण्याची भूमिका ठामपणे मांडली होती. तर दुसरीकडे पुरोहित संघ, जीवरक्षक, स्थानिक नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात रामकुंडातील काँक्रिट काढण्यावर स्मार्ट सिटीने भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ गोदावरीच्या आवर्तनाचा आढावा घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

- Advertisement -

गोदावरीप्रेमींच्या सातत्याच्या मागणीनंतर 12 कुंडांतील काँक्रिट काढण्याला रामकुंडापासून प्रारंभ करण्याची मागणी गोदाप्रेमींनी सातत्याने केली होती. रामकुंडासह 12 कुंडांतील काँक्रिट काढण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार हे काँक्रिट काढण्याची सूचना स्मार्ट सिटीला केली आहे.

हा निर्णय समितीने एकतर्फी घेतल्याचा आरोप होत असून त्याला पुरोहित संघासह पंचवटी सिटीझन फोरम, आदिवासी जीवरक्षक दल, स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने काँक्रिट काढण्याचे काम हाती घेतले तर वेळेप्रसंगी न्यायालयासह रस्त्यावर उतरून संघर्ष करू, यासाठी आता समिती स्थापन करण्यात येत असून त्या माध्यमातून या कामावर न्यायालयातून स्टे मागण्यात येणार असल्याचेही पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि कल्पना पांडे यांनी सांगितले.

त्रिस्तरीय समिती सदस्य असलेले जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांची काँक्रिट काढण्यासंदर्भात 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत काँक्रिट काढण्याची सूचना केली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती काँक्रिट काढण्याच्या सूचना स्मार्ट सिटीला प्राप्त झाल्याने यादृष्टीने स्मार्ट सिटीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, गोदाप्रेमींच्या म्हणण्यानुसार रामकुंडाला रामतीर्थ संबोधले जाते. ते यातील जिवंत झर्‍यातून येणार्‍या पाण्यामुळे. मात्र ते झिरेच काँक्रिटमुळे बंद झाल्याने रामतीर्थ नावाला लौकिकार्थाने महत्त्व मिळवून देण्यासाठी काँक्रिट काढणे गरजेचे असल्याची भूमिका गोदाप्रेमींनी मांंडली होती.

आवर्तनाचा आढावा घेणार

जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या सूचनेप्रमाणे काँक्रिट काढण्यात येणार आहे. यासाठी गोदावरीत सोडण्यात येणार्‍या आवर्तनाचा आढावा पोलीस बंदोबस्त घेण्यात येणार आहे.

– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

- Advertisment -

ताज्या बातम्या