Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याखरीप हंगामाची कृषी विभागाकडून तयारी; 'इतक्या' बियाणांची मागणी

खरीप हंगामाची कृषी विभागाकडून तयारी; ‘इतक्या’ बियाणांची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खरीप हंगाम 2023-2024 साठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना सर्वच बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे वेळेवर व मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. कृषी विभागाने या हंगामासाठी 1,1,474 क्विंटल बियाणांची तर 2,22,860 मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात रब्बी हंगाम संपत आला असल्याने खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. मागील वर्षी 6 लाख 28 हजार 33 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. यावर्षी यामध्ये वाढ झाली असून 6,26,873 हेक्टर क्षेत्र खरिपासाठी निश्चित केले आहे.

यासाठी 1,1,474 क्विंटल बियाणांची (यात 14,9666 सार्वजनिक व 86,508 खासगी) मागणी नोंदवली आहे. याबरोबरच 9,851 क्विंटल महाबीजमार्फत बियाणे मागणी केली आहे. हंगामासाठी 2 लाख 60 हजार मेट्रिक टन खतसाठ्याची मागणी नोंदवली होती. त्यातून एकूण 2,22,860 मेट्रिक टन कोटा मंजूर झाला आहे. एप्रिलअखेर यातील 28,972 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होणे अपेक्षित होते. परंतु यातील 18,962 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध झालेला आहे.

गतवर्षीचा 99,938 मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात 1,25,555 मेट्रिक टन खतसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी खते आणि बियाणे यांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांनी वेळेवर करावा. तसेच शेतकर्‍यांनी खतांची खरेदी एकदाच न करता आवश्यकतेप्रमाणे करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

युरियाला मागणी अधिक

खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांची युरिया खताला मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याअनुषंगाने एक लाख मॅट्रिक टन युरिया खताची मागणी केली असून, त्यातून 89,170 मेट्रिक टन मंजूर झाले आहे. त्यातून 8 हजार पाच मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. 24,517 मेट्रिक टन खतसाठा शिल्लक होता. जिल्ह्यात कपाशी बियाणे 1 जूनपासून पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीची घाई करू नये. शेतकर्‍यांनी अधिकृत कृषी निविष्ठा केंद्रातूनच खते व बियाणे खरेदी करावीत. खरेदी केलेली बिले जपून ठेवावीत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाचे जिल्हा मोहीम अधिकारी अभिजित जमदाडे यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या