Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जय्यत तयारी

‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची जय्यत तयारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवअंतर्गत (Svatantryacha Amrut Mahotsav )केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम ( Har Ghar Tiranga Campaign )राबवण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, निवासस्थाने इत्यादी इमारतींवर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवण्यात येणार असून या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल याची खातरजमा सर्व संबंधित अधिकार्‍यांनी करावी, असे शासन निर्णयानुसार कळवण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रत्येक विभाग, उपविभाग, विद्यापीठे, महाविद्यालये, कार्यालये यांच्या वेबसाईटच्या दर्शनी भागावर घरोघरी तिरंगा ही टॅगलाईन तसेच तिरंग्याचे चित्र प्रदर्शित करावे. सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अ‍ॅप आदी समाज माध्यमांवर तिरंगाविषयक चित्र, संदेश प्रदर्शित करण्यासाठी संबंधित विभागप्रमुख, कार्यालयप्रमुखांनी आवाहन करावे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरीचे आयोजन करून या उपक्रमाबाबत पालक व नागरिकांमध्ये प्रचार-प्रसार व जाणीव, जागृती करावी. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा समावेश करून मोठ्या प्रमाणावर आयोजन करता येईल. शासकीय, निमशासकीय इमारतींबरोबरच खासगी इमारतींवर अथवा राहत्या घरावर तिरंगा फडकवण्याबाबत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून इतर नागरिकांमध्ये या उपक्रमाची जागृती निर्माण होण्यास मदत होईल.

राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक करणार माहितीचे संकलन : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवअंतर्गत विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमांबाबतचे फोटो, चित्रफिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची कार्यवाही राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यामार्फत सुरू आहे. त्याचप्रमाणे घरोघरी तिरंगा कार्यक्रमाचे फोटो, चित्रफिती इ. मोठ्या प्रमाणावर संकेतस्थळावर अपलोड होण्यासाठी राज्य संपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी विशेष पथक तयार करून त्यांच्यामार्फत अपलोड करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून राज्यातील उपक्रमाची जास्तीत जास्त माहिती देशपातळीवर पोहोचेल.

घरोघरी तिरंगा उपक्रमाकरता राष्ट्रध्वजाची उपलब्धता महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागांमार्फतदेखील तालुका, गावपातळीपर्यंत करण्यासंबंधीच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून सुनिश्चित केलेल्या दराने राष्ट्रध्वज सर्वांना खरेदीसाठी उपलब्ध असतील. वरील सर्व उपक्रम राबवताना भारतीय ध्वजसंहितेचे पालन होणे आवश्यक असून जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

मनपातर्फे समूह राष्ट्रगान

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सवामध्ये मनपातर्फे समूह राष्ट्रगान कार्यक्रम होणार आहे. मनपातर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवामध्ये नाशिक महापालिकेतर्फे समूह राष्ट्रगान कार्यक्रम होणार आहे. 9 ऑगस्ट 2022 रोजी क्रांतिदिनाला राष्ट्रगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेचे सर्व सेवक सामूहिकरीत्या राष्ट्रगीत म्हणणार आहेत. यानिमित्त स्वागत लोगोसह महापालिकेच्या संपूर्ण इमारतीला विद्युत रोषणाई आणि मुख्य दरवाजाला आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. ध्वजस्तंभ आणि परिसर फुलांनी, रांगोळीने सजवण्यात येणार आहे. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या माहितीचे फलकही यावेळी लावण्यात येणार आहेत. एलईडी स्क्रीनवर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवअंतर्गत उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे.

राष्ट्रगान कार्यक्रमानिमित्त महापालिकेत अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. त्यांनी कार्यक्रम अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना केल्या. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंढे, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक नितीन धामणे यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या