प्राधान्यक्रम यादी तयार; पहिल्या टप्प्यात मिळणार २४ हजार कर्मचाऱ्यांना करोनाची लस

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

देशात करोना लस देण्यास सुरूवात करण्याची तयारी सुरू असून प्राधान्य आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील प्राधान्य क्रमाची यादी तयारी झाली असून सुमारे 24 हजार जणांना ही लस मिळणार आहे…

इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिकमध्ये चाचणी होणार नाही मात्र लसीकरणाची पुर्ण तयारी झाली असल्याची माहिती आरोग्य विभाग प्रशासनाने दिली.

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव घटत चालला आहे. नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा निम्म्याने कमी झाला आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा अधिक आहे. एकिकडे करोना नियंत्रणात येत असताना देशात करोना लस उपलब्ध होताच जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात होणार आहे.

यासाठी सर्वाधिक प्राधान्य करोनाशी दोन हात करणारे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याची सर्वत्र तयारी सुरू आहे. नाशिक जिल्ह्याची करोना लस प्राधान्यक्रमाची यादी तयार झाली असून शासकीय रूग्णालये व करोना उपचार करणारी खासगी रूग्णालये यांमधील वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

सरकारी रूग्णालयांमध्ये जिल्हा रूग्णालय, मालेगाव सामान्य रूग्णालय, महिला रूग्णालय, 5 उपजिल्हा रूग्णालये, 23 ग्रामिण रूग्णालये, 108 प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचा सहभाग असणार आहे.

तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील करोना रूग्णांवर उपचार करणार्‍या रूग्णालयांतील डॉक्टर व कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 100 टक्के शासकीय रूग्णालयातील कर्मचारी व नंतर इतर असे 18 हजार जणांना लस दिली जाणार आहे.

या लसींची साठवणुक, वाहतुक व वितरण याबाबत आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण नुकतेच पुर्ण झाले आहे. प्रत्येक केंद्रात कोल्ड बॉक्स व्यवस्था करण्यात आली असून हे बॉक्स विविध ठिकाणी पोहचवण्यासाठी आयसोलेटेड व्हनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगीतले.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या विविध केंद्रांमध्ये लहान मोठे 213 आईसलाईन रेफ्रिेजरेटर, 201 डीप फ्रीजर आहेत. अशी कोल्ड स्टोअरेजमध्ये एकुण 20 लाख लसी ठेवण्याची क्षमता आहे. तर कोल्डबॉक्स, व्हॅक्सीन कॅरिअर्सची संख्यास 24 हजार पेक्षा अधिक आहे. या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामिण भागापर्यंत लस पोहचवण्यात येणार आहे.

डॉ. रवी चौधरी, जिल्हा लस समन्वयक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *