खरीप हंगामपूर्व मशागतीला वेग

मजूर टंचाई, निकृष्ट कृषी निविष्ठांची धास्ती
खरीप हंगामपूर्व मशागतीला वेग

शिरवाडे वणी । वार्ताहर Shirvade Vani

येथील परिसरात खरीप हंगामाची ( Kharif Season )लगबग सुरू झाली असून बी-बियाणे, खते व शेतीसाठी लागणार्‍या विशिष्ट प्रकारच्या साहित्याची जमवाजमव करण्याचे काम झपाट्याने सुरू होताना दिसत असून लागवडीपूर्व मशागतीला वेग ( pre-planting tillage) आला आहे.

अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आणि शेती व्यवसायाला कायमचीच घरघर लागली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. त्यात पावसाची अवकृपा, मजुरांची टंचाई, वाढते मजुरीचे दर, निकृष्ट दर्जाचे बियाणे, खतांचा तुटवडा, अस्मानी-सुलतानी संकटे, दुबार पेरणीचे संकट, खराब हवामान, निसर्गाचा असमतोलपणा आदी अनेक कारणांनी बळीराजा त्रस्त झाला आहे. त्यातच पिकांना मिळणार्‍या अल्प भावामुळे शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे.

परंतु शेती हा पिढीजात व्यवसाय असल्यामुळे येरे माझ्या मागल्याप्रमाणे शेतकरीवर्गाला पुढील हंगामासाठी पुन्हा कंबर कसावी लागते. शेती लाभदायक व्हावी असे जरी वाटत असले तरी उत्तम शेती करूनही मालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे फक्त शेतीवर अवलंबून न राहता ध्येय गाठण्यासाठी औद्योगिकीकरण आणि आधुनिक क्षेत्राचा विस्तार वेगाने व्हावा हा हेतू साध्य करण्यासाठी शासनानेच काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

मागील वर्षाच्या खरीप हंगामाकडे दृष्टिक्षेप टाकला असता बहुतांशी शेतकर्‍यांचा पिकांवर केलेला खर्चदेखील न निघाल्यामुळे कमी खर्चात उत्तम शेती करण्याचे शेतकरीवर्गाकडून पावलोपावली प्रयत्न सुरू आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांपासून उन्हाच्या प्रचंड तीव्रतेने हैराण केले आहे. परंतु खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकरीवर्ग पुन्हा एकदा सज्ज होताना दिसत आहे.

सद्यस्थितीत खरीप हंगामातील मुख्य पीक टोमॅटो घेण्यासाठी शेतामध्ये मशागत करणे, खते पसरवणे, ठिबक सिंचन लावणे, मल्चिंग पेपर टाकणे आदी कामांना वेग आला आहे. त्यातच शेतकर्‍याने उत्पादित केलेल्या मालाला बाजारभावाची हमी नसल्यामुळे त्यावर उपाय म्हणून पीक लागवडीवर नियंत्रण ठेवणे तसेच कमी उत्पादन खर्चाची व अधिक उत्पादन देणारी शेती केल्याशिवाय पर्याय नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हवामानात बदल झाला असून पावसाचा अंदाज वाटत असल्यामुळे खरीप हंगामातील मशागतीला वेग आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com