ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्या उद्घाटन; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्या उद्घाटन; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील तरुण, तरुणींवर रोजगारासाठी शहरात स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये यासाठी यांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात येत असून त्यातूनच राज्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या, गुरुवारी या ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उदघाटन करण्यात येणार आहे, माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. कौशल्य विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या संकल्पनेनुसार आम्ही ५०० ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून येत्या १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या यांच्या हस्ते ही केंद्रे सुरु होतील, असे लोढा यांनी सांगितले.

या कौशल्य केंद्रात ग्रामीण भागातील व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक केंद्रात १०० विद्यार्थी असतील असा आमचा अंदाज आहे. या केंद्रात १८ वर्षावरील सर्व तरुण, तरुणींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून पुढे जाऊन या केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या- ज्या गावात हे केंद्र सुरु होणार आहे त्याच्या आजुबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटक यांचा कार्यक्रमात सहभाग वाढावा यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे, असे लोढा म्हणाले.

प्रत्येक गावात उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मैदान असेल तर मंडपाची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, वीज पुरवठा या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांच्यासह आशा आणि अंगणवाडी सेविका आदीं या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात आपला सहभाग नोंदवतील. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत,असेही लोढा यांनी सांगितले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com