...तर आम्ही भाजपसोबत जाण्यास तयार; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

मुंबई | Mumbai

वंचित बहुजन आघाडी (vanchit bahujan aaghadi) आणि शिवसेना (उबाठा) (Shivsena) यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असली तरी, वंचित बहुजन आघाडी मविआ (mva) चा घटक पक्ष असेल की, ही युती केवळ उध्दव ठाकरे यांचा गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्यापुरती मर्यादित असेल हे काँग्रेस, राष्ट्रवादीकडून (congress, ncp) अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यातच मविआ चे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील असंवाद गोंधळ निर्माण करणारा ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आजही भाजपाबरोबर (bjp) आहेत, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज झाले होते. यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले, “इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केले होते. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही.

तसेच “भाजपाला तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भांडण लावणे,  मतभेत निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात”, अशी टीकाही त्यांनी यावेळी भाजपावर केली.

युती बाबत ते म्हणाले, “आमची युती ही फक्त शिवसेनेशी झाली आहे. महाविकास आघाडीतील प्रवेशासाठी उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरू आहे”, असं ते यावेळी म्हणाले.

भाजप विषयी बोलताना पुढे ते म्हणाले, “आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत”, अशी प्रतिक्रियाही प्रकाश आंबेडकरांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com