Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याशक्तिप्रदर्शन अन् नाशिक प्रेम

शक्तिप्रदर्शन अन् नाशिक प्रेम

नाशिक । फारुक पठाण Nashik

भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह पाठिंबा दिल्यामुळे महायुतीचे सरकार आता डबल इंजिनवरून ट्रिपल इंजिन झाले आहे, तर उपमुख्यमंत्रिपदाची व वित्त मंत्रालय आपल्या हाती आल्यानंतर अजित पवारांचे पहिल्यांदाच नाशिकमध्ये आगमन झाले.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या स्वागताचे विशेष नियोजन केल्यामुळे दादांचे चांगले शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. तर शासन आपल्या दारी कार्यक्रमात दादांनी अनेक वेळा माझे नाशिक असे म्हणून नाशिकला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिल्यामुळे दादांचे नाशिक प्रेम चर्चेत आले आहे. नाशिकमधील 15 आमदारांवर त्यांची नजर असल्याचेदेखील बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात दादा काय खेळी करणार याकडे आता विरोधकांचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार प्रथमच नाशिकमध्ये आले. तेही थेट वंदे भारतने. नाशिकरोड रेल्वेस्थानकात त्यांचे आगमन झाल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नंतर मोटारसायकल, बाईक रॅली काढण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यावर पक्षप्रमुख शरद पवार यांचे नाशिकला जंगी स्वागत झाले होते. त्यामुळे अजितदादांचे स्वागत कसे होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार त्यांच्यासोबत गेले तर देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनीदेखील आज दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे दादांची ताकद आणखी वाढली आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरी दादा नाशिकचे पालकमंत्री होणार असल्याचेदेखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज दादांनी शक्तिप्रदर्शन करून नाशिकवर आपले विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगताना नाशिकचा सर्वांगीण विकास, नियो मेट्रो प्रकल्प, आगामी कुंभमेळा इत्यादी सर्व विषयांवर लक्ष घालणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात नाशिकमधील 15 आमदारांवर दादांची नजर आहे का? अशीदेखील चर्चा सुरू झाली आहे.

लक्ष्य लोकसभा

महायुती सरकारच्या वतीने नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन डोंगरे वसतिगृह मैदानावर करण्यात आले होते. जिल्हाभरातून हजारो लाभार्थी, नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आज झालेल्या कार्यक्रमातदेखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार की केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना त्यांच्या नेतृत्वाखाली भारत कशी प्रगती करत आहे, सामान्य नागरिकांचा कसा उद्धार होत आहे, गरिबी कमी होत आहे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ कशा पद्धतीने नागरिकांना मिळत आहे, शेतकर्‍यांना, युवकांना, महिलांना सक्षम बनवण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेदेखील पायाभरणी केल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या