वेदांतामुळे सकारात्मकता : श्री श्री रविशंकर

ज्ञानगंगा कार्यक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वेदांतामुळे सकारात्मकता : श्री श्री रविशंकर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ब्रह्म, सत्य, जगत्मिथ्या या उक्तीप्रमाणेच आज जग अध्यात्माकडे वळत आहे. आजच्या आधुनिक विज्ञानाने वेदांताचे दाखले देत त्याचा अनुकरण करायला सुरुवात केली आहे. जीवन सुगम व स्फूर्तीदायक बनवण्यासाठी वेदांत हे मार्गदर्शक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचे अनुकरण करून आपण आपले आत्मबल वाढवण्याची गरज असून, त्यातूनच जीवनात सकारात्मकता वाढण्यास मदत होणार असल्याचे जगद्गुरु श्री श्री रविशंकर ( Sri Sri Ravi Shankar)यांनी येथे सांगितले.दि आर्ट ऑफ लिव्हिंग नाशिक शाखेच्या वतीने ठक्कर डोम येथे श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञानगंगा कार्यक्रमाचे ( Dnyanganga )आयोजन करण्यात आले होते यावेळी सद्गुरु श्री श्री रविशंकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अध्यात्माचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे जीवन सफल करण्यासाठी प्रचंड साधने उपलब्ध आहेत. जी जगाकडे नाहीत. अमेरिकेतील प्रत्येक चार माणसांनंतर एक व्यक्ती हा प्रचंड दु:खी आहेत. त्यांच्याकडे सर्व सुख असताना जीवनात आनंद नाही. आपल्याकडे ज्ञानगंगा आहे. तिला प्रभावित ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. आपण आध्यात्मिक बैठकीने व योगाच्या बळावर आत्मबल वाढवायची गरज आहे. आध्यात्मिक ज्ञान, वैचारिक ज्ञान व सांगीतिक गान यांच्या माध्यमातून आत्मबल वेगाने वाढवता येऊ शकते, असेही श्री श्री म्हणाले.

रामायणावर बोलताना श्री श्री रविशंकर म्हणाले, रामायण, महाभारत ही भारताची धरोवर आहे. जनमानसात त्याचा प्रचंड प्रभाव आहे. दहा हजार वर्षांनंतरही त्याचा प्रभाव आजही तितकाच दिसून येतो. यावेळी श्री श्रींच्या उपस्थितीत सामुदायिक श्रीरामरक्षा पठण करण्यात आले. कार्यक्रम स्थळावर आगमन होताच श्री श्री यांनी वॉक वेच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाला फेरी मारत उपस्थित सर्व साधकांचे अभिवादन स्वीकार केले. यावेळी श्री श्रींना साधकांनी पुष्पगुच्छ, भेटवस्तू अर्पण केले.

आर्ट ऑफ लिव्हिंंगचे युवा शाखेचे प्रमुख चिराग पाटील यांनी प्रास्ताविक करताना नाशिकमध्ये तीन आनंददायी गोष्टींचा उल्लेख केला. त्यात इगतपुरीमध्ये ध्यान क्षेत्र बनवलं जात आहे. मेडिटेशन सेंटर, अ‍ॅम्पिथिएटर, शिवमंदिर तसेच श्री श्रींची निवासस्थान असलेली कुटीर यांची चित्रफीत सादर केली. तसेच यासाठी योगदान देणार्‍या सुहास गिरी, प्रसाद गिरी, पिंपळे यांचा सत्कार करण्यात आला. नाशिकमधील गोविंद नगर येथे ध्यान केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे सांगून यासाठी योगदान देणार्‍या दीपक चंदे, सागर मोटकरी, उल्हास पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच तिसरी गोष्ट म्हणजे त्र्यंंबकेश्वर ज्योतिर्लिंगजवळ श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाची उभारणी करण्यात आली आहे. या आश्रमासाठी योगदान देणार्‍या अशोक कटारिया, सतीश पारिक, करून सागर जिरे यांचाही श्रींश्रींच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असताना देखील ठिकठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी दिसून आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला होता. प्रचंड गर्दीतही नियोजन व्यवस्थित असल्याने कुठेही कोंडीची अथवा तणावाचे वातावरण दिसून आले नाही.

श्री श्री देसी बीज बँक

विविध भारतीय खाद्यपदार्थांचे नैसर्गिक व देशी बियाण्यांचे संगोपन करून त्या माध्यमातून सकस दर्जेदार बियाणे उपलब्ध करण्यासाठी श्री श्री देसी बीज बँकेची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून बियाणे उपलब्ध केली जातील. यासोबतच दर्जेदार बियाण्यांपासून शेतात तयार झालेली कडधान्य, फळ, भाजीपाला, नैसर्गिक गुळ, द्राक्ष आधी दर्जेदार उत्पादने शेतकर्‍यांकडून थेट ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यावेळी उपस्थितांना आध्यात्मिक धडाही श्री श्री रविशंकर यांनी दिला.

रामरक्षेतून बीजारोपण

आज रामरक्षा कवच हा मंत्र वाचन करणे म्हणजे अवकाशात आपण बिजांची पेरणी करणे आहे. आकाशातून आनंदचा वर्षाव हवा असेल तर मंत्रोच्चारातून आकाशात पेरणी करणे गरजेचे आहे. यातून एक शक्ती उत्पन्न होते. जी ज्ञानाची बरसात करते आणि त्यातून आपण आनंददायी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते हे याचे गमक असल्याचेही श्री श्री म्हणाले. अध्यात्मात आपणाकडे विपुल संपदा आहे. जे आपल्याकडे आहे, ते आणखी जोपासायला हवे. अन्न उत्पन्नासाठी जसं आपण जमिनीत बिजारोपण करतो. तसेच आध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी अवकाशात आपल्याला साधनेतून बीजारोपण करायचे आहे. यासाठी ध्यान आणि प्राणायाम या माध्यमातून साधना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com