Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकज्येष्ठ तबलावादक व प्रख्यात शिक्षक नवीन तांबट यांचे निधन

ज्येष्ठ तबलावादक व प्रख्यात शिक्षक नवीन तांबट यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील प्रख्यात शिक्षक आणि ज्येष्ठ तबलावादक नवीन तांबट यांचे आज निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा तांबट, मुलगा निनाद तांबट, सून आणि मुलगी आणि पुतणे असा परिवार आहे…

- Advertisement -

तांबट पेठे हायस्कूलचे निवृत्त शिक्षक होते. काही दिवसापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्यांची तब्बेत अधिकच खालावली होती. अखेर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

गेले काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवीन तांबट यांनी अनेक दिग्गज कलावंतांना साथ संगत दिली होती. त्यात प्रामुख्याने संगीतकार अनिल मोहिले, संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या अनेक कार्यक्रमात नवीन तांबट तबल्यावर साथसंगत देत असत.

पेठे विद्यालयातून ते क्राफ्ट टीचर म्हणून निवृत्त झाले होते. नाशिक एज्युकेशन सोसाटीच्या पालक शिक्षक संघाचे ते विद्यमान सदस्य होते. त्यांच्या निधनाने नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

नवीन तांबट सर म्हणजे शांत, संयमी आणि हसतमुख, विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नाते जोडून त्यांच्यात अभ्यासाविषयी रूची निर्माण करणे ही सरांची खासियत होती. त्यामुळेच अनेक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे कौशल्य तांबट सरांकडे होते.

सर तबला उत्तम वाजवत. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी कला व संगीताविषयी आवड निर्माण केली.

विद्यार्थ्यांना घडवणारा व आयुष्याला आकार देणारे तांबट सर माजी विद्यार्थ्यांनाही कायम हवेसे वाटत राहिले.

‘करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे शिक्षण व संस्काराचे महत्त्व साने गुरूजींनी सांगितले आहे ते तांबट सरांनाही लागू होते.

तांबट सर गुरू असूनही विद्यार्थ्यांशी मित्र म्हणूनच वागत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आदरयुक्त भिती वाटे. आणि तीस वर्षानंतरही ते अनेकांना नावानिशी ओळखत असत. सुख:, दु:खाविषयी जाणून घेत असत. हा माणुसकीचा, आपलेपणाचा स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत जपला.

ज्ञानयुक्त संस्कारांचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी दिला. समाजात चांगला माणूस घडवण्याचं मौलिक कार्य तांबट सरांनी केले. तोच वसा आणि वारसा नव्या पिढीपर्यंत नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

विश्वास जयदेव ठाकूर, (संस्थापक अध्यक्ष)विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या