Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानंदिनी नदीला पुन्हा प्रदूषणाचा विळखा

नंदिनी नदीला पुन्हा प्रदूषणाचा विळखा

नवीन नाशिक | निशिकांत पाटील New Nashik

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या गोदामाईचे पाणी शुद्ध व पवित्र मानले जाते. त्याचीच एक उपनदी म्हणजे नंदिनी नदी या नदीमध्ये स्वच्छ पाणी कमी तर दुर्गंधीयुक्त व आरोग्यास घातक पाणी जास्त आढळून येत आहे. तसेच संपूर्ण आवारात कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

- Advertisement -

नंदिनी नदीच्या प्रदूषणाला महापालिका प्रशासनासह अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील नागरिक तितकेच जबाबदार आहे. नदीत होणारे प्रदूषण थांबले नाही तर नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्र्यबकेश्वरच्या डोंगरदर्‍यातून वाहणारी नदी नाशिक शहरात नासर्डी नावाने परिचित होती. नदीची सध्या गटारगंगेसारखी अवस्था झाली आहे.

शहरातील विविध भागातील नाल्यांचे पाणी थेट नदीत मिसळत असल्याने नंदिनी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. तसेच उंटवाडी याठिकाणी परिसरातील नागरिक तसेच रस्त्यावर येणारे जाणारे नागरिक या नदीत कचरा फेकत असल्याने नदीच्या आजूबाजूला पूर्ण कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नदीला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

नदीच्या सीमारेषा ओलांडत अतिक्रमणही झाले आहे. अतिक्रमणामुळे नदीपात्र छोटे होत चालले आहे, नदीच्या किनारी परिसरात नागरी वस्ती उभी राहिल्याने येथील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. पाण्याबरोबर कचरा टाकला जात असल्याने नदीला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नंदिनी नदीला अनेक पावसाळी नाले जोडले गेले आहे, पावसाळ्यातील पाणी नदीतून वाहून जाणे हा याचा मुख्य उद्देश असताना पावसाळी नाल्यात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे आणि याच नाल्यातून हे पाणी थेट नंदिनी नदीतून वाहत आहे. अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतीतून केमिकलयुक्त पाणी नंदीनी नदीपात्रात सोडले जात आहे. नदीतून काळ्या रंगाचे पाणी वाहत असल्याने हे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. नंदिनीनदी किनारी तत्काळ स्वच्छता करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

स्वच्छतेकडे दुर्लक्ष

गेल्या काही दिवसांपासून नंदिनी नदी किनार परिसरात स्वच्छता झाली नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नंदिनीला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या