पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. कोरोना नियमांचे पालन होऊन मतदान प्रक्रिया पार पडावी म्हणून स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे.

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक आहे. या पोटनिवडणुकीत १९ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात आहे.

ही पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून या निमित्ताने महाविकासआघाडीला धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर पंढरपूरची जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीने शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पंढरपूर मतदारसंघातील ३ लाख ४० हजार ८८९ मतदार आज उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद करतील.

दरम्यान,कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आज पंढरपूर मतदारसंघातील ५२४ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत मतदान होईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.

मतदानासाठी प्रवास करण्यास मुभा

दरम्यान, पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com