Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या६ जानेवारी पासून ‘पाेलखाेल’ यात्रा

६ जानेवारी पासून ‘पाेलखाेल’ यात्रा

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या ४० दिवसापासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या आंदाेलनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी संपूर्ण राज्यभरात जनजागृती पंधरवडा घेण्यात येणार आहे. येत्या दि.६ ते २० जानेवारी दरम्यान पोलखोल यात्रा आयोजित केली जाणार आहे. या यात्रेचा समारोप दि. २० जानेवारी रोजी गुरू गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे होणार आहे.

- Advertisement -

आज नाशिक येथे संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गेल्या ४० दिवसापासून दिल्लीतील सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील शेतकरी प्रतिनिधी शंकर दरेकर यांनी हा आढावा मांडला. सध्या महाराष्ट्रातील संदीप आबा गिड्डे-पाटील व इंजी शंकर दरेकर हे गेल्या ४० दिवसापासून दिल्लीतील आंदोलनात सहभागी आहेत.

सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंजाब हरयाणामधील शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा होणार असून सध्या प्रचलित असलेल्या पध्दतीनुसार पंजाबमध्ये ८० टक्के अन्नधान्य किमान आधारभूत किंमतीने खरेदी करण्यात येते. मात्र महाराष्ट्रात हेच प्रमाण ५ टक्के आहे. शेतकरी आंदोलनातील किमान आधारभूत किंमतीचा कायदा तयार झाल्यास महाराष्ट्रातील किमान आधारभूत किंमतीने शेतमाल खरेदी करण्याचे प्रमाण ६० टक्के पर्यंत पोहोचणार आहे, याचा राज्यातील शेतकऱ्यांच फायदा होणार आहे.

सरकारने केलेल्या ३ कायद्यामध्ये ३९ त्रुटी केंद्र सरकारने मान्य केल्या असताना देखील काही मंडळी या कायद्याचे समर्थन करत असतील तर ही शेतकरी चळवळीसाठी दुर्दैवी बाब आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन सध्या या कायद्याचे फायदे सांगत आहेत. मात्र त्यांच्याच राज्यात हे कायदे आल्यापासून ४८ मार्केट कमिटी बंद पडल्या आहेत, हरदा जिल्ह्यातील कंत्राटी शेतीची कंपनी शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स करून पसार झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच राज्यात डोकावून पहावे.

केंद्र सरकारने ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांना घरगड्यासारखी वागणूक देणं सुरू आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन मोडण्यासाठी देखील ईडीचा गैरवापर सुरू आहे. राज्यात शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळेच संजय राऊत यांच्या परिवारातील सदस्यांना ईडी टारगेट करत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीत सांगलीचे संयुक्त किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे-पाटील, नाशिकचे इंजि. शंकर दरेकर, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मजदूर महासंघ, अमरावतीचे राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक श्रीकांत तराळ, लातूर येथील शेतकरी नेते लक्ष्मण वंगे, नाशिकचे संघर्ष शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, किसान क्रांतीचे समन्वयक योगेश रायते, जळगाव येथील किसान क्रांतीचे एस. बी. नाना पाटील, अहमदनगर येथील राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे अरूण कान्होरे, अमोल गोरडे, पद्माकर मोराडे आदी उपस्थित होते.

कंगनाच्या चित्रपटांवर बहिष्कार

शेतकरी आंदोलनावर कंगणांने बोलणे म्हणजे भाजपचाच प्रवक्ता बोलल्यासारखे आहे. त्यामुळे यापुढे देशातील शेतकरी कंगणांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकतील, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी केले. महाराष्ट्रातील आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या