Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढले राजकीय दौरे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढले राजकीय दौरे

नाशिक । विजय गिते Nashik

राज्यातील सत्तांतराच्या नाट्याची सुनावणी पूर्ण झाली असून आता लक्ष लागलेय ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडेे. याचा निकाल केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ लगोलग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत याच महिन्यात निवाडा होणार आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांसह सर्वच विरोधी पक्षही आता निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राजकीय आखाड्यात उतरण्याची जयत तयारी करताना दिसत आहे. यासाठी यात्रा, जाहीर सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे, बुथस्तरावरील बैठका घेऊन निवडणूकमय असे पोषक वातावरण निर्मितीस सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. यामध्ये पहिला अंक राहणार आहे, तो जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा.

राजकीय भवितव्य ठरविणार्‍या अनेक बाबी न्यायालयीन प्रक्रियेत असून त्यावर केव्हाही निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा निकाल लागल्यानंतर मोठी राजकीय उलथापालथ होऊन, राजकीय अस्थिरता निर्माण होत त्यातून मध्यावधी निवडणुका लागतील, असा कयास लावत त्याबाबतचा अंदाज राजकीय पंडितांकडून व्यक्त केला जात आहे. यातच पुढील वर्षी म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुकाही होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आता हालचाली गतिमान करत आपापले कार्यकर्ते चार्ज करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

या तयारीमध्ये सर्वाधिक पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नाशिक दौर्‍यावर येत कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्षाची स्थानिक पातळीवर कितीही गटबाजी असली तरी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या खासदारकीचे निलंबन व महागाई या मुद्यावरून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवत कार्यकर्ते जमविण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचा दोनशे प्लसचा नारा

सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोनशे प्लसचा नारा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये राज्य कार्यकारिणीची दोन दिवस बैठक घेत कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षालाही सूर गवसत असून दर 8-15 दिवसांनी पक्षात इतर पक्षातून येणार्‍या कार्यकर्त्यांचे इनकमिंग जोरदार सुरू आहे.

ठाकरेंना वाढती सहानुभूती

राज्यातील झालेल्या ऐतिहासिक राजकीय बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटात सहानुभूती वाढत असल्याचे चित्र जिल्हाभर आहे.पक्षप्रमुख ठाकरे यांनी मालेगावात जंगी सभा घेतल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळाली आहे. ठाकरे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबरोबरच पुढचीही तयारी झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून सहकारातही उतरण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी निवडणुकीत काय भूमिका असेल? याबाबत उत्सुकता आहे. त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नाशिक दौर्‍यानेही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे.

कृउबा निवडणुका भविष्यातील ट्रेलर

शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्यही न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे आता राजकीय नेते व पदाधिकार्‍यांनी आपापले दौरे करून आपला पाया भक्कम करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. हा भविष्यातील निवडणुकांचा ट्रेलर असून तोच भविष्यातील निवडणुकांचा पाया समजण्यात येत आहे. त्यामुळे कधी नव्हे ती वेगळी भूमिका घेत राजकीय पक्षांनी सहकारातही पाया रोवण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीच्या निवडणुका या पक्ष चिन्हावर होणार नसल्या तरी राजकीय पक्षांच्या भरभक्कम पाठिंब्यावर या निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण तापविण्यास आता सुरुवात झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या