Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराजकीय यश हे जनतेचे श्रेय

राजकीय यश हे जनतेचे श्रेय

मुंबई ।प्रतिनिधी

मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेने दिली म्हणून इथपर्यंत पोहचता आले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी आपल्या पाच दशकांच्या राजकीय वाटचालीचे आणि संसदीय राजकारणात सातत्याने टिकून राहण्याचे श्रेय जनतेला दिले. जनतेने दिलेल्या प्रेमापोटी कृतज्ञता व्यक्त करताना पवारांनी कार्यकर्त्यांना शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

शाहू,फुले,आंबेडकर यांचे केवळ नाव घेउन चालणार नाही तर त्‍यांनी जे विचार दिले,जी दृष्‍टी दिली त्‍या माध्यमातून काम करून त्‍या विचारांना पुढे नेणारी एक नवी पिढी तयार करण्याचे आव्हान आपल्‍याला स्‍वीकारावे लागेल.त्‍यांच्या विचारांना पुढे नेणारे समृद्ध, विचारी कार्यकर्ते घडवून त्‍यांच्या माध्यमातून एक प्रगत समाज घडवावा लागेल, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षातील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना पवार यांनी आपल्यावर झालेल्या संस्काराचा पदर उलगडून दाखवला. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला,

आपल्या मार्गदर्शनात पवार यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे दाखले दिले. पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी मुंबईत गेट ऑफ इंडिया उभारण्यात आले. ते जेव्हा आले, तेव्हा गेटजवळ एक व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीला बाजूला करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. तेव्हा पंचम जॉर्ज यांनी स्वतः उतरून त्यांची भेट घेतली. ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले होते. त्यांच्या हातात पत्र होते. त्यात संकरित वाण तयार करण्याची मागणी होती. दुसरी मागणी दुग्ध व्यवसायासंदर्भातील होती. संकरित गाई निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली होती. ज्योतिबांना आपण महात्मा मानतो की, त्यांनी विज्ञानाचा आधार घेतला,असे पवार यांनी नमूद केले.

बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला भक्कम व्यवस्था दिली. पण, त्यांनी इतरही क्षेत्रातही योगदान दिले. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या स्थानिक सरकारमध्ये बाबासाहेबांकडे पाण्याशी संबंधित खाते होते. भाक्रा-नांगल धरणाच्या माध्यमातून अन्नधान्याचा प्रश्न सोडण्यास मदत झाली पाहिजे. पाण्यापासून वीज निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विज्ञानाचा आधार घेतला. त्या विचारांची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या