काँग्रेसची मोठी हानी, निष्ठावाण नेता हरपल्याची भावना

ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसची मोठी हानी, निष्ठावाण नेता हरपल्याची भावना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड (Jayaprakash Chhajed) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने नाशिकसह (Nashik) महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष अशी विविधांगी ओळख असलेले जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शोकभावना व्यक्त करतांना म्हटले की, ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे.

तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शोकभावना व्यक्त करतांना म्हटले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांच्या निधनाने कष्टकरी, कामगार वर्गाचा बुलंद आवाज आज शांत झाला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील त्यांचे योगदान मोठं आहे. छाजेड कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शोकभावना व्यक्त करतांना म्हटले की, काँग्रेस पक्षाशी अतिशय निष्ठावान असलेल्या छाजेड यांना स्व.विलासराव देशमुख यांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. या काळात त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवर अनेक संघटनात्मक पदे त्यांनी भूषविली. इंटक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने इंटक संघटना कायमची पोरकी झाली असून लढवय्या कामगार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय छाजेड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी शोकभावना व्यक्त करतांना म्हटले की, नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस वाढवण्यामध्ये जे दोन तीन नावे आहेत त्यामध्ये जयप्रकाश छाजेड यांचे नाव होते. काँग्रेसशी अगदी एकनिष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख होती.त्यांनी हाती घेतलेला काँग्रेसचा झेंडा शेवटच्या क्षणापर्यंत खांद्यावर ठेवत तो टिकवला देखील. कुणाच्याही मदतीला कुठल्याही क्षणी जातील असे मनमिळाऊ व्यक्तिमहत्व आज आपल्यातून हरपले आहे त्यामुळे नाशिक काँग्रेससह त्यांचा परिवार व मित्र परिवाराची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

गांधी-नेहरू घराण्याची निष्ठा असलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. छाजेड व पानगव्हाणे परिवाराचे दृढ संबंध होते. त्यांच्या निधनाने पानगव्हाणे परिवारालाही धक्का बसला आहे.

राजाराम पानगव्हाणे,प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस

ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांनी विद्यार्थी जीवनापासूनच युवकांचे व फादर काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले. जनरल सेक्रेटरी, उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पद भूषवले. विधान परिषदेचेही ते सदस्य होते. इंटकच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडविले. स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उल्हास दादा पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ.शोभा बच्छाव,माजी राज्यमंत्री

काँग्रेसचे जुने जाणते नेतृत्व पक्षाने हरपले आहे. त्यांच्या जाण्याने फार मोठी कधीही भरून न येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. युवक ते इंटक असा मोठा प्रवास करत त्यांनी सेवा केली आहे.

शरद आहेर,प्रभारी शहराध्यक्ष शहर काँग्रेस

काँग्रेसचे अनेक वर्ष जयप्रकाश छाजेड यांनी काम केले असून जिल्ह्यात त्यांनी पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढविले. पक्षाचे आधार छत्र हरपले, याचे तीव्र दुःख होते.

डॉ.तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com