हरितालिकेच्या दिवशीच पोलीस पत्नीची आत्महत्या

कौटुंबिक वादातून घेतला गळफास : विवाहितेच्या वडिलांचा पतीसह सासूवर आरोप
हरितालिकेच्या दिवशीच पोलीस पत्नीची आत्महत्या

जळगाव । (Jalgaon) प्रतिनिधी

शहरातील मेहरुण परिसरातील विश्वकर्मा नगरात कोमल चेतन ढाकणे (वय 24) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास समोर आली. मयत कोमलचे हिचे पती चेतन अरुण ढाकणे हे पोलीस कर्मचारी असून भुसावळ बाजारपेठ पेालीस ठाण्यात नोकरीला आहे.

पतीसह सासू यांच्याकडून होणार्‍या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कोमल हिने आत्महत्या केल्याचा आरोप कोमलचे वडील प्रविण शामराव पाटील (रा. मेहरुण) यांनी केला आहे. दरम्यान अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला सर्वत्र हरितालिका साजरी करत असतांना दुसरीकडे सौभाग्यामुळेच कोमलवर आत्महत्येची दुर्देवी वेळ आली.

कोमलचे पती तसेच सासू हे दोन्ही चिमुकल्यांना सोबत गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे मेहरुण तलावाकडे मंदिरावर दर्शनाला गेले होते. यादरम्यान घरी एकटे असलेल्या कोमलने छताला गळफास घेवून आत्महत्या केली.

दर्शनानंतर पती तसेच सासू सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरी परतले असता, कोमल ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. कोमल हिच्या पश्चात पती चेतन, सासू मंदाबाई व दोन मुले आयुष (4 वर्ष) व पियुष (पाच महिने) असा परिवार आहे.

पतीसह सासूच्या छळामुळे आत्महत्या

कोमलचे पती पोलीस कर्मचारी आहेत. कोमल हिला पहिला मुलगा झाल्यानंतर तिचा पोलीस पतीसह सासूकडून छळ करण्यात येत होता. गेल्या पाच वर्षापासून घरगुती कारणावर तिला वेळावेळी शिवीगाळ करत मारहाण करण्यात येत होती. याच छळाला कंटाळून कोमल हिने आत्महत्या केली असल्याचा आरोप मयत कोमलचे वडील प्रविण शामराव पाटील यांनी केला. तसेच याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलिसांची कारवाई सुरु होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com