पोलीस बनले 'विघ्नहर्ता'! महिला आणि मुलाचे वाचवले प्राण

पोलीस बनले 'विघ्नहर्ता'! महिला आणि मुलाचे वाचवले प्राण

करंजी खुर्द | प्रतिनिधी

ब्राम्हणवाडे येथील कौटुंबिक समस्येला कंटाळत आत्महत्या करायला निघालेल्या महिलेला सायखेडा पोलिसांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळत अनंत चतुर्दशीला सायखेडा पोलिसांच्या रुपात विघ्नहर्ता आल्याचे दिसून आले....

अनंत चतुर्दशीनिमित्त सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी हे गोदावरी नदीवरील सायखेडा पुलावर बंदोबस्ताची पाहणी करत असतांना पुलाच्या बाजूने ब्राम्हणवाडे ता. निफाड येथील पल्लवी उर्फ ताई गोरख माळी (२८) या आपला मुलगा रोहित (५) याच्यासह पळत आल्या.

मुलाला काखेत घेत मुलासह उडी मारणार तोच सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी महिलेकडे बघत उडी मारू नको म्हणत धाव घेतली. त्याच वेळी पुलावर प्रवास करणारे अशपाक शेख, भाऊसाहेब ससाणे, सद्दाम शेख हे थांबत महिला पोलीस कर्मचारी उर्मिला काठे यांच्या मदतीला आले. महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत तिचे मनपरिवर्तन केले. मूळची ब्राम्हणवाडे येथील असल्याचे सांगत कौटुंबिक समस्येतुन आत्महत्या करत असल्याचे त्या महिलेने सांगितले.

दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी महिलेसह मुलास नवीन कपडे भेट दिले. दरम्यान सायखेडा पोलिसांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com