
पेठ | Peth
तालुक्यातील करंजाळी जवळील उभीधोंड येथे धार्मिक उत्सवानिमित्त दिलेल्या जेवणातून विषबाधेची घटना घडली आहे. झालेला प्रकार वेळीच लक्षात आल्याने करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमकडून वैद्यकीय उपचार तातडीने ३९ विषबाधितांपैकी ३१ बाधितांवर औषधोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर ८ बाधितांवर आंतररुग्ण विभागात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैधकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली...
या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक आरोग्य सुविधांबाबत सूचना केल्या. गावात धार्मिक उत्सव असल्याने ७० ते ८० ग्रामस्थांनी दुध, पुरणपोळी, बटाटा वटाणाची भाजी, पेढा व दही यांचा समावेश असणारा प्रसाद रात्री ९ ते १० वाजेदरम्यान सेवन केला.
पहाटेपासून बहुसंख्य ग्रामस्थांना त्रास होऊ लागल्याने गावातील आशा वर्कर्सने ही बाब करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चोरडीया यांना कळविली. वैद्यकीय पथकाने उभीधोंड गाठून बाधित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु केले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
नरहरी झिरवाळांनी तातडीने घटनास्थळी व वैद्यकीय उपचाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तहसीलदार अनिल पूरे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दुग्धजन्य पदार्थामुळे विषबाधा झाल्याची शक्यता वैद्यकीय यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.