कोविड रुग्णास डिस्चार्ज दिल्यानंतर महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ नाही

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

कोविड रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर किंवा रुग्णाची लक्षणे कमी झाल्यानंतर कालांतराने रुग्णास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याचा आग्रह धरू नये. याप्रसंगी योजनेचा लाभ मिळविणे शक्य होत नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे…

नाशिक शहरामध्ये सुद्धा या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना पुरेपूर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून शहरातील बरीचशी रुग्णालये ही कोविड रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

या रुग्णालयापैकी बरीचशी रुग्णालये ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत करण्यात आलेली असून अशा रुग्णालयांमध्ये योजने संबंधी माहिती दर्शविणारे फलक लावण्यात आले आहे.

या रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेणे शक्य आहे, परंतु सदरील लाभ घेताना लाभ कसा मिळवावा या संदर्भात माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेताना रुग्ण अथवा रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णास योजनेशी अंगीकृत करण्यात आलेल्या रुग्णालयात भरती करणे आवश्यक असून भरती करतेवेळीच रुग्णालयाला रुग्णास योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा यासंबंधी कल्पना देणे आवश्यक आहे.

तसेच रुग्ण रुग्णालयात भरती करताना योजनेसंबंधी कागदपत्रांची पूर्तता करणे ही आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये प्रमुख्याने शिधापत्रिका व आधार कार्ड मतदान कार्ड यासारखे ओळखपत्र या बाबींचा समावेश होतो.

योजने संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी योजनेशी संलग्नित करण्यात आलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये मदत केंद्र स्थापित करण्यात आले असून तेथे आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

हे आरोग्यमित्र वैद्यकीय सल्लागार नसून आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी सहाय्यक म्हणून कार्यरत असतात. तसेच योजने संबंधित वैद्यकीय सल्ल्या व्यतिरिक्त इतर माहिती संदर्भात मदत करण्याकरिता त्यांची नियुक्ती केलेली असते.

योजनेचा लाभ घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णालयात भरती करते वेळेसच रुग्णालयास योजनेअंतर्गत रुग्णाला समाविष्ट करणे संबंधी कळविणे व कागदपत्रांची ताबडतोब पूर्तता करणे अत्यंत आवश्यक असते. योजने संबंधी अधिक माहिती साठी 155388 अथवा 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *