
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर (America Tour) असून त्यांनी आज व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन (Jill Biden) यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना आणि मोदींनी अध्यक्षांसह जिल बायडेन यांना काही भेटवस्तू दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना प्रयोगशाळेत (laboratory) तयार केलेला ७.५ कॅरेटचा एक ग्रीन डायमंड (Green Diamond) भेट दिला. हा ग्रीन डायमंड जमिनीतून मिळालेल्या हिऱ्यांप्रमाणेच रासायनिक आणि ऑप्टिकल गुणधर्म दाखवतो. तसेच हा डायमंड ईको-फ्रेंडली असून त्याच्या निर्मितीमध्ये सौर आणि पवन उर्जेसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करण्यात आला आहे.
तसेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदींनी राजस्थानातील (Rajasthan) जयपूर (Jaipur) येथील एका कुशल कारागिराने चंदनाच्या लाकडापासून बनवलेली पेटी भेट दिली आहे. या पेटीत त्यांच्यासाठी अनेक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील (Karnataka) म्हैसूरमधून आणलेल्या चंदनावर वनस्पती आणि प्राण्यांची बारीक नक्षी कोरून ही पेटी तयार करण्यात आली आहे. तसेच या पेटीमध्ये गणपतीची चांदीची एक मूर्ती असून ही मूर्ती कोलकत्त्यातील एका सोनार कुटुंबाने तयार केलेली आहे. याशिवाय यामध्ये एक पणती देखील आहे.
त्याचबरोबर या चंदनाच्या पेटीत चांदीच्या १० छोट्या डब्या असून यामध्ये १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पंजाबमधील तूप, राजस्थानमधील २४ कॅरेट हॉलमार्क केलेले सोन्याचे नाणे, ९९.४ कॅरेट चांदीचे नाणे, महाराष्ट्राचा गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतले तीळ, भूदानाचे प्रतीक म्हणून (भूमीचं दान) कर्नाटकातील चंदनाचा तुकडा, गोदानाचे (गायीचं दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधील कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ, झारखंडमध्ये हाताने विणलेले रेशमी कापड, गुजरातमधील मीठ देखील देण्यात आले आहे.
तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी पंतप्रधान मोदींना २० व्या शतकाच्या सुरुवातीला तयार केलेली एक हस्तनिर्मित, प्राचीन अमेरिकन बुक गॅली भेट दिली आहे. तसेच व्हिंटेज अमेरिकन कॅमेरा, जॉर्ज ईस्टमन यांच्या पहिल्या कोडॅक कॅमेऱ्याचे पेटंट आणि अमेरिकन वाइल्डलाइफ फोटोग्राफीचे एक हार्डकव्हर पुस्तक देखील बायडन दाम्पत्याने (Biden Couple) मोदींना भेट दिले.