मोदींची संपत्ती ३६ लाखांनी वाढली : शाहांची ४ कोटींनी घटली

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाखांनी वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांची संपत्ती ४ कोटींनी घटली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही बाब समोर आली आहे.

पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. मागील वर्षी ती २.४९ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्या बँक खात्यात ३.३ लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची ३३ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे. जून महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींकडे फक्त ३१,४५० रुपये रोख रक्कम होती. तर गुजरातमधील गांधीनगरच्या स्टेट बँकेच्या खात्यात २,३८,१७३ रुपये रक्कम होती. त्याचबरोबर याच शाखेत मोदींची मुदत ठेव असून विविध प्रकारे जमा झालेली रक्कम १,६०,२८,९३९ इतकी आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांकडे ८,४३,१२४ रुपयांची राष्ट्रीय बचत पत्रे (एनएससी), १,५०,९५७ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज आणि २०,००० रुपयांचे करबचतीचे इन्फ्रा बॉण्ड्सही आहेत. तर १.७५ कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती आहे.

मोदींच्या नावावर कर्ज नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलेही कर्ज घेतलेले नाही तसेच त्यांच्या नावावर वैयक्तिक गाडीही नाही. त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या असून त्यांचे एकूण वजन सुमारे ४५ ग्रॅम इतके असून त्याची किंमत १.५ लाख रुपये आहे. त्याचबरोबर गांधीनगरच्या सेक्टर -१ येथे मोदींच्या नावावर ३,५३१ स्वेअर फूटाचा प्लॉट आहे. मात्र, हा प्लॉटचे तीन जण मालक असून यामध्ये प्रत्येकाची २५ टक्के भागीदारी आहे.

शाहा यांना ४ कोटीचा फटका

दरम्यान, शेअर बाजारातील उतार चढावचा फटका गृहमंत्री अमित शाह यांना बसला आहे. त्यांची आजची निव्वळ संपत्ती २८.६३ कोटी रुपये आहे, जी गेल्या वर्षी ३२.४ कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुनलेत शाह यांच्या संपत्तीत ४ कोटी रुपयांनी घट झाली आहे.

किती आहे शाहांची संपत्ती

शाहा यांच्याकडे १० अचल संपत्ती आहे. त्यात आईकडून वारसदार हक्काने मिळालेली १३.५६ कोटी आहेत. त्यांच्यांकडे १५ हजार ८१४ रोख आहे. बँकेत १.०४ कोटी विमा व पेन्शन पॉलिसीत १३.३७ लाख रुपये, एफडीत २.२७ लाख रुपये आहे. ४४.४७ लाखांचे दागिणे आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *