
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आज तिथीनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. राज्य सरकारकडून या सोहळ्याची भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री व लाखो शिवभक्तांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी उदयनराजे भोसले यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांना पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. ढोलताशांच्या गजराने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून गेला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सर्वांसाठी नवी उर्जा घेऊन आला आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक अद्भुत अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य, सुशासन, समृद्धीची गाथा आजही प्रेरणादायी आहे.
राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण ही शिवाजी महाराजांच्या शासनव्यवस्थेची मूल तत्व होती. आज स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले रायगडाच्या प्रांगणात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आजचा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो, असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, शिवरायांनी कायम एकतेला महत्व दिले. शिवाजी महाराज यांनी नुसते परकियांचे आक्रमण रोखले नाही, तर नवराष्ट्रनिर्माण करण्यासाठी जनतेला प्रेरित केले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन मागील वर्षी भारतीय नौसेनेच्या ध्वजावर राजमुद्रेला स्थान दिले. हा ध्वज आज नवीन भारताची आन, बान, शान बनून फडकत आहे. आम्हाला गर्व आहे की अनेक देशात शिवाजी महाराजांच्या नितींवर चर्चा होते आणि संसोधनही होते, असेही त्यांनी म्हटले.