
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत दूरदृश्य प्रणालीद्वारे आज दि. २० जानेवारी रोजी, विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या देशभरातील सुमारे ७१ हजार उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी युवकांशी संवाद साधला.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने रोजगार मेळा हे एक पाऊल आहे. रोजगार मेळा, रोजगार निर्मितीमधील प्रेरणादायी घटक म्हणून काम करेल तसेच युवावर्गाला त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रविकासात त्यांच्या थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल. हा हेतू समोर ठेऊन या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
दरम्यान, देशभरातून निवडण्यात आलेले नवनियुक्त उमेदवार, भारत सरकारच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंते, लोको पायलट, तंत्रज्ञ, उप निरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, ग्रामीण डाक सेवक, आयकर निरीक्षक, शिक्षक, नर्स, डॉक्टर, सामाजिक सुरक्षा अधिकारी, स्वीय सहाय्यक-पीए, बहू-उद्देशीय स्टाफ - एमटीएस, अशा विविध स्थानांवर / पदांवर रुजू होतील.