
पुणे | Pune
भाजपचे पिंपरी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. ते 59 वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे.
लक्ष्मण जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन वेळा पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या सत्तांतरापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी लक्ष्मण जगताप हे पुण्यातून रुग्णावाहिकेतून मुंबईला गेले होते. त्यानंतर जगताप यांना मतदानासाठी व्हिलचेअरवरुन आत नेण्यात आले होते. त्यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीचे अनेकांनी कौतुक केले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९८६ साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर, जगताप यांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षपही राहिले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. त्यांची दोनवेळा महापौरपदी वर्णी लागली. त्यानंतर २००४ साली ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. या काळात ते राष्ट्रवादीतच होते.
२०१४ पर्यंत अजित पवार यांचे विश्वासू आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप मनसे पाठिंब्यावर निवडणूक लढली पण पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून उमेदवारी मिळवत त्यांनी विजय मिळवला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी पालिकेत भाजपला विजय मिळवून दिला.
दरम्यान पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनातून पक्ष सावरत असतानाच लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने आणखी एक धक्का बसला आहे.