Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामाझी वसुंधरा अभियान : पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत राज्यात अव्वल

माझी वसुंधरा अभियान : पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत राज्यात अव्वल

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या ‘माझी वसुंधरा (Majhi Vasundhara) २.०’ २०२१-२२ स्पर्धेतील मानकऱ्यांना मुंबई येथे पर्यावरण दिनानिमित्त (Environment Day) आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले. या अभियानात सलग दुसऱ्या वर्षी निफाड तालुक्यातील (Niphad taluka) पिंपळगांव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील चांदोरी ग्रामपंचायतीने (Chandori Gram Panchayat) राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला (Shirsathe Gram Panchayat) पृथ्वी (Earth) या घटकासाठी विशेष राज्यस्तरीय पुरस्कार (State level awards) प्राप्त झाला आहे.

अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (CEO Lina Bansod) यांचाही सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत (Majhi Vasundhara Abhiyan) नाशिक जिल्हयाने (Nashik district) सलग दुस-या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली असून पर्यावरणपुरक गाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई येथील नरीमन पाँईंट जवळील टाटा थिएटर येथे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) ग्रामीण विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) पर्यटन, राजशिष्टाचार पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य उद्धव ठाकरे (Aditya Thackeray पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर (Manisha Patankar – Mhaskar) आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वाच्या आधारे राबविण्यात येणाऱ्या या अभियानात शासनाने नाशिक जिल्हयातील १० हजाराच्यावर लोकसंख्या (Population) असलेल्या जिल्ह्यातील १५ तर १० हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ८१ अशा एकुण ९६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

तसेच जुलै २०२१ ते एप्रिल २०२२ या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम करण्यात आले. यात पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच नदी-नाले यांची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणाऱ्या बदलांसाठी जनजागृती (Awareness) करणे यासारख्या पर्यावरणीय घटकांवर (Environmental Factors) काम करण्यात आले.

प्रत्येक ग्रामपंचायतींचा आराखडा तयार करुन ग्रामपंचायतींसाठी जिल्हा व तालुका स्तरावरुन संपर्क अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Lina Bansod) तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO of Water and Sanitation Department) वर्षा फडोळ (Varsha Fadol) व माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी (Nodal Officer) यांनी अभियानाचे प्रभावी संनियंत्रण केले.

एप्रिल महिन्यात सर्व ९६ ग्रामपंचायतींची काम शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. सदर कामांची शासनाकडून डेस्कटॉप पडताळणी करण्यात आली यामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हयातील २७ ग्रामपंचायतींची शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.

आज पर्यावरण दिनानिमित्ताने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हयातील ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या (Pimpalgaon Gram Panchayat) वतीने सरपंच. अलका बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम,गटविकास अधिकारी संदीप कराड, शिरसाठे ग्रामपंचायतीच्या (Shirsathe Gram Panchayat) वतीने सरपंच (प्रशासक) गोकूळ सदगीर,ग्रामसेवक हनुमान दराडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, चांदोरी ग्रामपंचायतीच्या (Chandori Gram Panchayat) वतीने सरपंच (प्रशासक) सौ. वैशाली चारोस्कर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भांबारे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ आदी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियान सुरु झाल्यावर पहिल्याच वर्षी जिल्हयातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला होता. यानंतर अभियानाच्या दुस-या वर्षीदेखील पिंपळगांव ग्रामपंचायतीने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. जिल्हयातील ३ ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणे ही जिल्हयासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. यावर्षी या अभियानात ९६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेऊन पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणसमृध्द गाव करण्यासाठी लोकसहभागातून चांगली काम केली आहेत. अभियानासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींना या अभियानात करावयाच्या कामांविषयी माहिती तसेच नियेाजन करुन देण्यात आले. सर्व गावांचे ‘गाव कृती आराखडे’ तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली. यापुढेदेखील माझी वसुंधरा अभियानामध्ये शासनाकडून निवडण्यात येणा-या ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरणपुरक गाव तयार करण्यासाठी काम करण्यात येईल.”

लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

- Advertisment -

ताज्या बातम्या