Sunday, May 5, 2024
Homeनाशिकउत्तर महाराष्ट्रात सहा महिन्यांत प्रथमच पेट्रोल ९० वर

उत्तर महाराष्ट्रात सहा महिन्यांत प्रथमच पेट्रोल ९० वर

नाशिक :

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्या नाहीत. परंतु आपल्या शहरातील पेट्रोल पंपांवर गेल्या सहा महिन्यात किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सहा महिन्यांत पेट्रोल-डिझेलमध्ये १३ रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असून उत्तर महाराष्ट्रात ९० रुपयांवर पेट्रोल जाऊन पोहचले आहे. इंधनाच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. शुक्रवारपासून सरकारी तेल कंपनी असलेली इंडियन ऑईल (IOC), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) ने पेट्रोलचे भाव १५ पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव २३ पैसे प्रतिलिटरने वाढवले. रोज १०, २० पैशांनी होणारी वाढीमुळे सहा महिन्यांत पेट्रोल-डिझेल १३ रुपयांनी वाढले आहे.

दररोज ६ वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

एक्स्पर्ट व्ह्यू…

करोना काळात कासवगतीने पेट्रोलचे दर वाढत राहिले. गेल्या सहा महिन्यात तेरा ते साडेतेरा रुपयांनी वाढलेले आहेत. लॉकडाऊन काळात सरकारकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नव्हते, त्यामुळे इंधनावरील कर, सेवा कर वाढविण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी क्रूड ऑईल प्रतीबॅरेल शंभर रुपयांच्या वरती गेले होते. तेव्हा पेट्रोल आजच्या दरापेक्षा कमी दरात मिळत होते. त्यानंतर आज क्रूड ऑईलची किंमत ५० टक्क्यांनी घटली असताना पेट्रोलची दरवाढ मात्र झालेली दिसते आहे. दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात डीझेलचे दर कमी आहेत, कारण डीझेल घेणारे ग्राहक सतत देशांतर्गत वाहतूक करत असतात. त्यामुळे ज्या राज्यात डीझेलचा भाव कमी असतो त्या राज्यातून डीझेल भरून वाहतुकीला प्रारंभ ते करतात.परिणामी, डीझेलची मागणी वाढते. जर पेट्रोलचे भाव इतर राज्यांच्या तुलनेत कमी-जास्त असतील तर त्याचा परिणाम पेट्रोल खरेदीवर होत नाही.

भूषण भोसले, नाशिक पेट्रो असोसिएशन नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या