उत्सव नर्तनाने दिवाळी आरंभ

उत्सव नर्तनाने दिवाळी आरंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील तेरा वर्षांपासून नाशिकमधील (Nashik) तीन महत्त्वाच्या कथक (kathak) नृत्य संस्था किर्ती कला मंदिर (Kirti Kala Mandir), अभिजात नृत्य नाट्य कला अकादमी (Abhijat Nrutya Natya Kala Academy) आणि कलानंद कथ्थक नृत्य संस्था (Kalanand Kathak Nrutya Sanstha) एकत्र येऊन नाशिकरांना त्यांच्या नृत्य साधनेतून कलामयी दिवाळी (Diwali) साजरी करण्याची संधी देत असतात...

दरम्यान, यंदा करोना (Corona) काळातील अनेक संकटांवर मात करत पुन्हा एकदा आनंदाचे, उत्साहाचे वातावरण तयार होत आहे. त्याच अनुषंगाने या कथक नृत्य संस्थांच्या वतीने दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस निमित्ताने नृत्य साधनेतून सादर करण्यात आला.

यावेळी तिन्ही संस्थांच्या वतीने या आनंदोत्सवात वेगवेगळ्या प्रस्तुत करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात भक्ती देशपांडे व विद्यार्थिनींनी कौशिकी चक्रवर्तींच्या ‘दीप की ज्योत जले’ या गीतावरील दीप नृत्याने केली.

सुमुखी अथनी ने सुरेश वाडकरांनी गायलेल्या अजय चक्रवर्तींच्या रचनेवरील संत तुलसीदासांची दुर्गा स्तुती तर अदिती पानसे यांनी शौनक अभिषेकींनी गायलेली रामस्तुती सादर केली.

कलानंदच्या विद्यार्थिनींनी संजीव अभ्यकरांनी गायिलेली देवकी पंडितांची गणेशस्तुती व लता मंगेशकरांनी गायिलेले ‘श्रीराम चंद्र कृपालू भज मन’ हे रामभजन सादर केले. तर किर्ती कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी रुद्राष्टक व कुमुदताई अभ्यंकरांनी स्वरबद्ध केलेले कृष्णाष्टक सादर केले.

अभिजातच्या विद्यार्थिनींनी स्री जागराला नवी दिशा देणारे विवेक गरुड यांनी लिहिलेले व सुनील देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेले ‘मिळून सार्‍याजणी’ हे गीत पारंपरिक नृत्यखेळांच्या सहाय्याने सादर केले. विद्याहरी देशपांडे यांनी गोरक्षनाथांचे ‘गुरुजी मैं तो एक निरंजन ध्यांऊजी’ हे कुमार गंधर्वांचे निर्गुणी भजन नृत्यरुपात सादर केले.

तसेच कुमार गंधर्वांनी स्वरबध्द केलेली होरी ही त्यांनी विद्यार्थिनींसोबत सादर केली. कार्यक्रमाची सांगता तीन ही संस्थांच्या एकत्रित भैरवीने झाली. यात रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी ही सहभागी झाल्या. आजच्या कार्यक्रमास ध्वनी व्यवस्था राम नवले व प्रकाश योजना आदित्य रहाणे यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन प्रेषिता पाठक पंडितने केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com