जनता सत्ता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही

- शरद पवार यांचा शिंदे फडणवीस सरकारला इशारा
जनता सत्ता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही

मुंबई |प्रतिनिधी Mumbai

सत्ता केंद्रीत करणारा प्रयत्न ताकद देण्याचा असू शकतो. परंतु जनता बोलत नाही ती बघत असते, निरीक्षण करत असते. आज देशातील अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांनी मंगळवारी शिंदे फडणवीस सरकारला दिला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपला दिला. तसेच राज्यात आगामी काळात नवे राजकीय चित्र दिसेल, असे भाकीतही पवारांनी वर्तवले.

राज्यातील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक(Meeting of the State Executive of the Nationalist Congress Party) आज यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडली. त्यावेळी बोलताना पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम भाजप करत आहे. मध्यप्रदेश असेल आणि आता महाराष्ट्रात काय चालले आहे, हे तुम्हाला माहीत आहे. लोकशाही मार्गाने आलेल्या लोकांना बाजूला करुन सत्ता आपल्या हातात कशी राहील असा प्रयत्न होत आहे. ईडी, सीबीआय या गोष्टी आपल्याला कधी माहीत नव्हत्या. आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप पवार यांनी केला.

आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठेही हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरोधात शिवसैनिक एकत्र येत आहे. राज्यात सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत, त्यामुळे एक वेगळे चित्र आगामी काळात पाहायला मिळेल, असे भाकीत पवार यांनी केले.

आजपर्यंत पक्षाचा २३ वर्षाचा कालखंड झाला. यामध्ये साडेसतरा वर्षे आपण सत्तेत होतो. आपण सत्ता बघितली आणि सत्ता नसलेला काळही बघत आहोत. त्यामध्ये मला समाधानाचा काळ हा विरोधात असताना वाटतो, असा दावा पवार यांनी केला.

आगामी नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीत नेतृत्वाची फळी तयार करण्याचे आणि सर्व घटकांना न्याय कसा देता येईल याचा विचार झाला पाहिजे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला कसा जाईल असा प्रयत्न करा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

अशक्य ते शक्य करून दाखवले : जयंत पाटील

गेल्या पाच वर्ष विरोधात काढली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ५४ आमदार निवडून आले. शरद पवार साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना आवडले नाही आणि पहिल्या दिवसापासून आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी केला. देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कुणी रोखला नाही. मात्र पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करून दाखवत राज्यात सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार स्थापन केले आणि कृतीतून दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही हा विश्वास निर्माण केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे

राज्यात कुठल्याही निवडणूका लागल्या की आपण तयार असले पाहिजे. मग त्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूका करा किंवा ताकद असेल तर तिथे एकट्याची ताकद दाखवा. मात्र, भाजपचा पराभव करायचा असेल तिथे एकत्र आले पाहिजे असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com