लोकप्रतिनिधींनी प्रतिबंधित क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे : डॉ. सुधाकर शिंदे
मुख्य बातम्या

लोकप्रतिनिधींनी प्रतिबंधित क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे : डॉ. सुधाकर शिंदे

ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आयुक्त व महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शिंदे यांचे आवाहन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील करोना वाढता प्रादुर्भाव रोकण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी आपापल्या भागातील प्रतिबंधित क्षेत्राचे प्रतिनिधित्व करावे. तसेच आपल्या प्रभागांत आरोग्य तपासणी करून अति जोखमीच्या व्यक्ती यांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवावेत असे आवाहन ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आयुक्त व महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले.

नाशिक शहरात करोना संसर्ग वाढत असुन पुढच्या काळात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता शासनाकडुन व्यक्त करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्यासाठी व स्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. शिंदे यांनी काल नाशिक महापालिकेस भेट देत अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले.

शहरातील करोना प्रतिबंधात्मक कार्यवाही योग्य रीतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नाशिक शहरांमधील मराठा विद्या प्रसारक समाजाचे मेडिकल कॉलेज येथे जास्त प्रमाणात खाटांची संख्या वाढविणे व एसएमबीटी कॉलेजमध्ये बाधित रुग्ण भरती करण्याबाबत सूचना केल्या. शहरातील रुग्ण संख्या लक्षात घेता ऑक्सीजन व व्हेंटीलेटर खाटा या महिनाअखेरपर्यंत वाढविण्याची सुचनाही त्यांनी केली.

शहरात नवीन रुग्णालयातील आयसीयू चालू करणे बाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत दिली. सर्व आमदार महापौर व इतर लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले. शासना मार्फत पुरविण्यात आलेले पी.पी.किट व मास्क महानगरपालिके पर्यंत प्राप्त झालेले नाही. आडगाव येथील मेडिकल कॉलेज संपूर्ण अधिग्रहीत करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे शासनामार्फत सदरची कार्यवाही करण्यात यावी असे सर्वच आमदारांनी सांगितले.

शहरांमध्ये जास्तीत जास्त रुग्णांच्या तपासणी करण्यात यावी याकरिता नाशिक महानगरपालिकेतर्फे अँटी जेन टेस्टिंग सुरू करण्यात आलेली आहे. सर्व खाजगी रुग्णालयांंनी व फिजिशियन यांनी आयसीएमआर यांच्याकडे अँटी जेन टेस्टिंग करण्यासाठी नोंदणी करून घेण्यात यावी. त्याबाबतचे किट खरेदी करून तपासणी करण्यात यावी. तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध होत नसल्यास महानगरपालिकेतर्फे या सर्वांना किट पुरवण्यात येणार आहे.

संबंधीत रुग्णालयांनी रुग्णांचे सर्व यादी महानगरपालिकेस कळवावी व स्वतः खरेदी केल्यानंतर घेतलेले किटच्या बदल्यात किट परत देण्यात यावेत. मनपाकडे मनुष्यबळाची कमतरता असून डॉक्टर, नर्स व इतर पदे तात्काळ भरण्यात करिता आ. फरांदे यांनी शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली. महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याबाबत डॉक्टर संघटनांना आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीस महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टेकर, मुख्यलेखा परीक्षक बी. जे.सोनकांबळे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, शहर करोना नोडल ऑफिसर डॉ. आवेश पलोड, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैदाने यांच्यासह आ. देवयानी फरांदे, आ. सिमा हिरे, आ. राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, संजय बागुल, आय एम ए नाशिक व नाशिक रोड यांचे अध्यक्ष उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com