गद्दारांना जनता जागा दाखवेल : ठाकरे

गद्दारांना जनता जागा दाखवेल : ठाकरे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शिवसेनेतून (Shiv Sena) फुटून निघालेल्या 40 गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणूक (Election) लढवून दाखवा, कोण जिंकतो ते बघा, जनता आमच्या पाठीशी आहे. हे चित्र सध्या संपूर्ण राज्यात दिसत असून गद्दारांना जनता पुन्हा निवडून देणार नाही. मी आजही मुख्यमंत्री (Chief Minister) व 40 गद्दारांना चॅलेंज करतो त्यांनी राजीनामा द्यावा व पुन्हा जनतेसमोर यावे. जनता त्यांचा पराभव करून गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिला.

येथील आर्टिलरी सेंटर (Artillery Center) रोडवर असलेल्या जाधव मळा परिसरातील मोकळ्या मैदानात आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्याप्रसंगी ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, सुनिल बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, शुभांगी पाटील, विलास शिंदे, वसंत गिते, माजी आमदार योगेश घोलप, योगेश गाडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, आज मी राज्यात जिथे फिरत आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन जनता आम्हाला प्रतिसाद देत आहे. मात्र गद्दार जिथे जातात तिथे जनता त्यांना उभे करत नाहीत. आजच्या सभेला महिलासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात दिसून येते. शिवसेना एकच असून एकच राहणार आहे. संपूर्ण राज्य महाविकास आघाडीसोबत उभे आहे. ज्यांनी गद्दारी केली ते जनतेला पटलेले नाही.

अडीच वर्षे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेची जी सेवा केली, त्यामुळे देशभरात महाराष्ट्राचे नाव अग्रस्थानी राहिले. खोकेवाल्यांच्या सभा बघा व आमच्या सभा बघा. आमच्या सभेला जनता स्वत:हून येते व आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगतात. पारंपरिक मतदार शिवसेनेसोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सध्याच्या सरकारच्या काळात अनेक उद्योग गुजरातला गेले.

त्यामुळे येथील तरूणांचा रोजगार बुडाला. चाळीस गद्दारही गुजरातलाच पळून गेले होते. सर्वकाही गुजरातमध्ये जात आहे. आजच्या सभेला अनेक तरुण चेहरे मला दिसत असून हेच शिवसेनेचे भवितव्य आहे. यावेळी आकाशात 40 खोके असलेले फुगे उडाल्यानंतर हे फुगे गुजरातला जायला नको तेवढे बघा, अशी कोपरखळी त्यांनी मारली. नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी दिलेल्या जोरदार लढतीबाबत ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.

कोणी कोणाच्या पाठीत वार केला, हे 40 गद्दार सांगू शकतात का? असा सवाल करून ते म्हणाले, जे आपले मतदार नव्हते ते देखील शिवसेनेसोबत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. तर दुसरीकडे खोके वाटून रिकामे झाले पण लोक येत नाहीत. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून उभे राहा. माझ्या अंगात बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त आहे. तुमचे आणि माझ देखील रक्त एकच आहे, कारण आपक्या रक्तात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच शिकवण आहे.

नाशिक हे माझं आवडत शहर आहे. मात्र विकासात नाशिक हरवले आहे. कारण नाशिककरांना (Nashik) प्रथम ब्लु प्रिंटमध्ये व नंतर दत्तक घेणार्‍यांनी येथील जनतेच्या तोंडाला पाने पुसली. परंतु आता आपणास संधी मिळाल्यानंतर नाशिकची सेवा करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईल. कारण नाशिकचा शाश्वत विकास कसा होणार याचा विचार करणे गरजेचे आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.

यावेळी दानवे म्हणाले की, शुभांगी पाटील निवडणूक हरल्या पण जनतेच्या मनात जिंकल्या. येणार्‍या काळात आदित्य ठाकरे हेच परिवर्तन करणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकसह महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) उद्योग गुजरातला (Gujrat) गेल्याबाबतचा आवाज आदित्य यांनी उठविला. तसेच येणार्‍या काळात विधान परिषदेसह महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीवर (Grampanchayat) शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपनेते बबनराव घोलप, दत्ता गायकवाड, वसंत गिते, सुधाकर बडगुजर यांचेही भाषणे झाले. सूत्रसंचालन देवानंद बिरारी व सुधाकर जाधव यांनी केले. सभेला शिवसैनिकांसह जनतेने मोठी गर्दी केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com