
नाशिक । प्रतिनिधी Nashik
क्वालिटी सिटी उपक्रमांतर्गत स्वच्छता, शिक्षण, आरोग्य या तीन मुद्यांवर काम करावयाचे आहे. या सोबतच कौशल्य विकासावरही काम अपेक्षित आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबत सामंजस्य करारही करण्यात आलेला आहे. विविध संघटनांनी आपापल्या माध्यमातून कामाला सुरूवातही केलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात जोपर्यंत कोणतेही काम जनता हातात घेत नाही तोपर्यंत त्यात यश मिळत नाही या उद्देशाने क्वालिटी सिटी उपक्रम जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
देशात क्वालिटी सिटी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक शहराची निवड केली असून, त्या माध्यमातून शहरातील विविध सामाजिक संस्थांद्वारे करण्यात आलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या सभागृहात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना पालकमंत्र्यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी प्रशासनाला सुचना देताना एनजीओ काम करीत असताना मनपा प्रशासनाला फक्त नियमित कामांत सुधारणा करायच्या आहेत. त्यांना त्यासाठी खर्च येणार नसताना कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढवण्याचे निर्देश दिले.
सुरुवातीला क्वालिटी सिटीचे समन्वयक जितूभाई ठक्कर यांनी क्वालिटी सिटीची संकल्पना विषद केली. विविध संघटना, मनपा व क्वालिटी कौंन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शहराला क्वालिटी सिटी बनवण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. प्रायोगिक तत्वावर प्रभाग 7 मध्ये काम सुरू केले असून, त्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळीवरुन स्वयंसेवक तयार करण्याचे प्रयोजन आहे. नंतर त्या माध्यमातून समाजात जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी बांधकाम क्षेत्रातील क्वालिटी बद्दलच्या कामांची माहिती दिली. बांधकामाच्या जागेवर कामगारांचे स्किल वाढवण्यावर भर दिला जात असताना बिगारी कामगाराचा गवंंडी कसा तयार करता येईल या दृष्टीने 4500 कामगारांंचे प्रशिक्षण सुरू असल्याचे सांगितले. कामगारांच्या मुलांपैकी ड्रॉप आऊट झालेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा डाटा संकलीत करण्याचे काम सुरू आहे. लोकांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्या कामगारांच्या स्वत:च्या घराचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत असल्याचे सांगितले. या कामासाठी क्रेडाईने युथविंग व महिला विंगवर जबाबदारी देण्यात येत असल्याचे त्यांनी नमुद केले. शहराचा रिंग रोड 9 मिटरचा केल्यास भविष्यातील अडचणी सुटण्यास मदत होईल, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली.
नाशिक सिटीझन फोरमच्या माध्यमातून प्रभाग 7 मध्यें क्वालिटी प्रभाग बनवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून त्यासाठी 25 जणांची टीम बनवण्यात आली आहे. त्या टिममध्ये 5 युवा, 5 ज्येष्ंठ, 5 महिला व समाज कार्यात रस असलेल्या 10 नागरिकांचा सहभाग राहणार आहे. त्यासोबतच स्कील डेव्हलपमेंटसाठी कारचे ड्रायव्हर, औद्योगिक कामगार, शिपाई, घरकाम करणार्या महिला यांना प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास करण्यात येणार आहे. या माध्यमातून शहर क्लिन व स्किलफूल करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नाशिक सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष सचिन गुळवे यांनी सांगितले.
शिक्षणाच्या माध्यमातून मनपा व जिल्हाभरात शाळाबाह्य मुले न राहण्यासाठी दिड वर्षाचा अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून, 8वी, 9वीतील मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्कुल बस चालक, शाळेतील मुलांना सांभाळणार्या आया यांंंना प्रबोधन करुन त्यांची मानसिकता तयार करण्यात येणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांनी नमुद केले.
निमाच्या माध्यमातून कामगारांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. कारखान्यातील निर्णयक्षम अधिकार्यांशी संवाद साधून त्यांच्या माध्यमातून कामगारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.कार्मिक व्यवस्थापकांच्या बैठका घेऊन त्यांच्या माध्यमातून कामगारांच्या प्रशिक्षणाचे नियोजन केले जाणार आहे. तसेच विविध कामगार संघटना, अंतर्गत कामगार संघटना यांची बैठक घेऊन त्यांना प्रबोधन करण्यात येणार असल्याचे निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.
आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांनी वेस्टचे डिस्पोजल कसे करायचे यावर नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. दिड ते दोन लाख कामगारांचे स्कील मॅट्रिक्स करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण मालिका घेणार असल्याचे नमुद केले.
देशातल्या 31 क्लस्टरमध्ये अग्रक्रमाने काम करणार्या नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या माध्यमातून औद्योगिक कामगारांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे संस्थापक व माजी अध्यक्ष विक्रम सारडा यांनी सांगितले. नाशिक इंजिनिअरींग क्लस्टर मोठ्या प्रमाणात सुरक्षेवर काम करीत असून, त्यासोबतच विविध साधनांच्या शास्त्रीय चाचण्या करण्याची प्रणाली आहे. त्यामाध्यमातून तांत्रिक सहाय्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. क्लस्टरच्या माध्यमातून साडेतीन हजार कामगारांना प्रशिक्षण दिले असल्याचेही त्यांनी नमुद केले.
आयएमएच्या वतीने श्रिया कुलकर्णी यांनी रोटरी, जेसीआय, लायन्स क्लबच्या माध्यमातून शहरात काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच नर्सींग, वॉर्ड बॉय, क्लिनिक या भागात प्रशिक्षणाचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी स्वामी कंठानंदजी यांनी लोकांमध्ये शब्दांचा नाही तर कृतीचा लवकर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने कृतीतून कामाला सुरूवात करण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील विसंगती संपवली नाही तर येणारी पिढी धोक्यात राहणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
यावेळी उपस्थितांनी सामुदायिक पंचप्रण केला.या बैठकीला आ. सिमा हिरे आ. देवयानी फरांंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, मनपाचे माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी गटनेते गजानन शेलार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, नामकोचे उपाध्यक्ष प्रशांत दिवे, निताचे अरविंद महापात्रा, तानचे अध्यक्ष सागर वाघचौरे, अरुण सूर्यवंशी, कॉम्प्युटर असोसिएशनचे सचिन शिंदे, शरण्या शेट्टी, चंद्रकिशोर पाटील, मनोज साठे, राजेंद्र अहिरे, ललित बूब, धनंजय बेळे, मनिष बाविस्कर, भारती जाधव, जगबिर सिंघ, विक्रम कापडीया, संदिप कुयटे, डॉ. प्रशांत शेटे, प्रभाकर मोराणकर, उमेश वानखेडे, रवी महाजन, आदींसह राजकिय पदाधिकारी होते.