Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणूक लांबल्याने राजकीय आघाडीवर सामसूम

निवडणूक लांबल्याने राजकीय आघाडीवर सामसूम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आधी करोना( Corona ) आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाची ( OBC Reservation) न्यायालयीन लढाई यामुळे लांबलेली नाशिक महापालिकेची निवडणूक ( NMC Elections ) आता पावसाळ्यानंतर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण थंडावल्याचे दिसून येत आहे. तरी काही दिग्गज इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहे. दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आयोगाचे निर्देश आल्यास निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

- Advertisement -

गेली पाच वर्षे नाशिक महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता होती. पहिल्या अडीच वर्षांत ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी तर दुसर्‍या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सतीश कुलकर्णी यांनी महापौर म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मात्र वेळेत निवडणुका न झाल्याने नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 14 मार्च 2022 पासून प्रशासक राजवट सुरू झाली आहे.

दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिकेची निवडणूक होणार नाही, असे शासनाचे म्हणणे होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत उलट निर्णय आल्याने आता ओबीसी आरक्षणाशिवाय पावसाळ्यानंतर निवडणुका होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेले विविध राजकीय पक्षांचे इच्छुक

उमेदवार सध्या थंडावल्याचे दिसून येत आहे. नाशिक महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना पक्षाने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसेनादेखील जोमाने कामाला लागली आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे व सेना नेते व खासदार संजय राऊत वरचेवर नाशिकला येऊन आगामी महापौर शिवसेनेचाच होणार, असा दावा करीत आहेत. साहजिक खरी लढाई शिवसेना विरुद्ध भाजप अशीच राहणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

15 कोटींची तरतूद

आयोगाच्या निर्देशांनुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील नगरसेवकसंख्या 122 वरून 133 इतकी झाली आहे. तीन सदस्यीय 43 तर चार सदस्यीय एक अशाप्रकारे एकूण 44 प्रभाग अस्तित्वात आले आहेत. प्रभाग रचनेच्या अंतिम आराखडा देखील जाहीर करण्यात आला असून निवडणूक तसेच मतदान, मतमोजणी पर्यंत लागणार्‍या मनुष्यबळाची यादी तयार करण्यात आली आहे.

नाशिक मनपा प्रशासनाने 2011 च्या जनगणनेनुसार 15 लाख 85 हजार लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना केली आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुमारे 1,410 मतदान केंद्रे होती. मात्र यंदा मतदार संख्या वाढणार असल्याने सुमारे 200 मतदान केंद्रे वाढवण्यात येणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयोगाचे निर्देश आल्यावर महापालिका प्रशासन निवडणूक घेण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

भूसंपादन घोटाळा नडणार?

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडीचे सरकार आहे तर मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण होऊन शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केले आहे. तेव्हापासून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. कोणत्याही मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकमेकाला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळेच नाशिक मनपा निवडणुकीच्या प्रचारात भाजप सत्ताकाळात मध्ये महापालिकेत झालेल्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार असे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सध्या या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या