पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख : राज्यपाल

पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख : राज्यपाल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वेद, अस्र, शस्र आणि शास्त्र (Veda, Asra, Shasra and Shastra)भारतात अनादी काळापासून नांदत आहेत. आम्ही भारतीय जेवढे पूजेसाठी शांत असतो तेवढेच क्रांतीसाठीही शस्रसज्ज (Armed for revolution )असतो. त्यामुळे पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. ते येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या(Bhonsala Military School) 85 व्या स्थापनादिनी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे विभागीय अध्यक्ष कॅप्टन एस. जी. नरवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षणदृष्टया आत्मनिर्भर होतो आहे. आपल्या शस्र आणि अस्रांची निर्मिती देशातच करण्याच्या संकल्पनेतून 100 सैनिकी शाळा भारतात निर्माण केल्या जाणार आहेत.बालपणापासून देशभक्ती आणि शस्र चालविण्याचे आणि युद्धनीतिचे धडे आम्हा भारतीयांना मिळाले तर भविष्यात कुणीही जवान शहिद होणार नाही, असे सांगून या सर्व संकल्पनांची पायाभरणी 1935 मध्ये डॉ. बाळकृष्ण शिवरामपंत मुंजे यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून केली.

आम्हा भारतीयांच्या सर्वांगीण संस्कृतीला दडपण्याचा प्रयत्न ब्रिटीशांनी केला. भारतीयांचे ज्ञान, विज्ञान आणि बुद्धीमत्तेला नेहमीच कमकुवत करण्याचे व तसे बिंबवण्याचे प्रयत्न इंग्रजांनी वेळोवेळी केले. परंतु आपली संघर्षाची आणि विजयाची परंपरा रावणाच्या पराभवापासून सुरू होते आणि ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होईपर्यंत ती आजही कायम आहे. आमची शस्र परंपरा आणि अस्रांची शक्ती अनादी आहे, शाश्वत आहे, आमच्या देव-देवतांही शस्रधारी आहेत.आमच्या मुली सैनिकी शिक्षणातून माता दुर्गा बनून दृष्टांचा,शत्रुंचा विनाश करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रभु रामचंद्र यांनी सोन्याची लंका जिंकूनही तिच्या मोहात न अडकता माता आणि मातृभुमीला स्वर्ग मानले.जिंकल्यानंतर शत्रुला गुलाम बनविण्याची आमची परंपरा नसून शत्रुलाही सन्मानपूर्वक वागविण्याची आमची संस्कृती यातून अधोरेखित होते, असेही कोश्यारी म्हणाले.

25 लाख रूपयांची देणगी

यावेळी सेंट्रल हिदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी स्कूलच्या ऐतिहासिक व गौरवशाली परंपरेचे कौतुक केले. येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक भाग्यशाली असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन करताना राज्यपाल कोश्यारी यांनी या संस्थेस त्यांच्या अधिकारात असलेल्या फंडातून 25 लाख रूपयांची देणगीही यावेळी जाहीर केली. प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती महासचिव दिलीप बेळगांवकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांंनी संचलन, प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांची मने जिंकली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com