पवारांची माघार मविआसाठी ‘बूस्टर’ ठरणार

पवारांची माघार मविआसाठी ‘बूस्टर’ ठरणार

नाशिक । फारुक पठाण Nashik

सत्तेत असो की नसो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे नेहमीच चर्चेत असतातच. त्यांच्या राजकीय खेळीमुळे अनेकांना ते भुईसपाट देखील करतात अशी अनेक उदाहरणे आहेत. मध्यंतरी असाच एक प्रयोग करून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे त्यांनी जाहीर करून त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आपण राजीनामा मागे घेत असल्याचे सांगत राजीनामा मागेही घेतला, मात्र राजीनामा जाहीर करण्यापासून मागे घेण्यापर्यंत सुमारे 72 तासांच्या काळात महाविकास आघाडीला बूस्टर मिळाले हे नक्की म्हणावे लागेल.

शरद पवार नावच पुरेसे आहे, असे राजकीय क्षेत्रातील जाणकार म्हणतात. महाराष्ट्र राज्याचे चार वेळेचे मुख्यमंत्री तसेच केंद्रात मंत्रीसह विविध पदांवर काम करणार्‍या पवारांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. बदलत्या काळात त्यांनी स्वतःला तसेच आपल्या राजकीय कौशल्याला देखील बदलले आहे. त्यामुळे त्यांचा वरचष्मा कायम राहिला आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस संपल्यात जमा असल्याचा प्रचार सुरू केला होता. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधून तसेच काँग्रेसमधून अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अशा वातावरणात पवारांनी पक्षाची धुरा एक हाती सांभाळत 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले होते. यादरम्यान कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी पावसात भिजून प्रचार केल्यामुळे एका सभेत गणित बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला होता.

निकालानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यात त्यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावत महाविकास आघाडीची स्थापना केली व कधीही एकत्रित निवडणूक न लढणार्‍या शिवसेनेसोबत महाराष्ट्राची सत्ता स्थापन केली. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करीत होता.जून 2022 मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता कोसळली व शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाविरुद्ध शिंदे गट असा नवीन संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष देशाच्या सर्वोच्च न्यायालयातदेखील पोहोचला. त्याची सुनावणी पूर्ण झाली असून आता फक्त निकाल येणे बाकी आहे.

निकाल जर ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री शिंदेसह सुमारे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातातून जाऊ नये, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय तसेच राज्यस्तरीय नेत्यांनी पर्यायी व्यवस्था तयार केल्याचे बोलले जात होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन मुख्यमंत्री होतील अशी देखील चर्चा सुरू झाली होती.

यामुळेच अनेक ठिकाणी अजित पवार भावी मुख्यमंत्री असे फलक देखील लागले होते.मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे देखील महाराष्ट्रात अनेक दौरे झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांची शहांसमवेत बैठक झाल्याचे बोलले आहेत. हे वातावरण तापत असतानाच 2 मे रोजी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने जमलेल्या हजारो नेते कार्यकर्त्यांसमोर शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण अचानक पालटले. हजारो नेते, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन पवारांनी राजीनामे मागे घ्यावा, अशी विनंती केली. तर तब्बल 72 तासांनी पवारांनी राजीनामे मागे घेत असल्याचे सांगितले. दरम्यान या 72 तासात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये जो ऊर्जा भरली ती नक्कीच महाविकास आघाडीसाठी बूस्टर ठरणार यात शंका नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com