रेमडेसिवीरसाठी पुन्हा रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ

जिल्ह्याला कमी पुरवठा
रेमडेसिवीरसाठी पुन्हा रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ

नाशिक । प्रतिनिधी

शहर व जिल्ह्यात रेमडिसिव्हरचा मोठा तुटवडा भासत असून रुग्णालयांकडे रेमडेसिवीरची मागणी नोंदवुनही इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईकही हताश झाले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

देशातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांच्या जिल्हास्तरीय यादीत नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याला दैनंदिन इंजेक्शनच्या गरजेच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात पुरवठा होत आहे.परिणामी,रुग्णालयेही हतबल झाली आहेत.प्रशासनाने कंपन्या , डिलरला थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरविण्याचे आदेश दिले आहेत.पण प्रत्यक्ष पुरवठाकमी होत असल्याने रुग्णालयांकडून नातेवाईकांनाच इंजेक्शन आणण्याचा आग्रह धरला जात आहे.

जिल्ह्यात सध्या साडेसहा हजार ते सात हजार रुग्णांसाठी रेमडेसिवीरची मागणी आहे. पण, उपलब्ध केवळ 500 ते हजार होत आहे. विहित व्यवस्थेत मागणी करूनही रुग्णालयांना इंजेक्शन मिळत नसल्याने आजही नातेवाईकांची वणवण कायम आहे. रेमडेसिवीरसाठी रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आहे. रेमडिसिव्हरबाबत जिल्हा प्रशासन व रुग्णालय यांच्याकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णालय नातेवाईकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जायला सांगतात. पण इथे कोणी अर्ज सुध्दा घेत नाही. पूर्ण यादी दिली जात नाही. रुग्णालयांना पुरेसे इंजेक्शन दिले जात नसून त्याचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com