प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार - बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे

प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार - बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नवीन प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे (Water Transport Project)प्रवाशांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे (Ports and Mines Minister Dada Bhuse)यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात मुंबईतील जलवाहतूक यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भुसे बोलत होते. यावेळी बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा आदी उपस्थित होते.

मुंबई परिसराला लाभलेला समुद्र किनारा प्रवासी जल वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आहे. मुंबई परिसरात राबविण्यात येणाऱ्या या विविध प्रकल्पांमुळे मुंबईतील प्रवासी जल वाहतुकीत मोठी क्रांती होणार आहे. राष्ट्रीय जल वाहतूक मार्गाच्या अंतर्गत तसेच मुंबई आणि परिसरातील प्रवासी जल वाहतुकीचे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पर्यावरण, वन विभागाच्या सर्व अत्यावश्यक परवानग्या घेऊन हे प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यात यावेत, अशी सूचना भुसे यांनी यावेळी केली.

मुंबईतील प्रवासी जल वाहतूक अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने जेट्टींच्या पायाभूत सुविधांचा विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा, सर्व दृष्टीने सुरक्षित अशा अत्याधुनिक बोटी, इलेक्ट्रॉनिक आणि सोलर बोटी यांचा समावेश तसेच बोटींची दुरुस्ती, नव्या बोटी तयार करणे यासाठी शीपयार्डची बांधणी यावर हे प्रकल्प राबविताना भर देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया या नवीन प्रवासी जल वाहतूक मार्गावरही विशेष लक्ष देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई एमएमआर क्षेत्रात प्रवासी जल वाहतूकीचे १३ मार्ग आहेत. अन्य प्रस्तावित मार्गांमध्ये सागरमाला प्रकल्पांतर्गत वसई ते भाईंदर, वसई खाडीतून जाणारा कल्याण ते भाईंदर, रेडिओ क्लब ते मिठी बंदर, बेलापूर ते मिठी बंदर, मनोरी ते मार्वे, करंजा ते रेवस, गोराई ते बोरीवली या मार्गांचा समावेश आहे. डीसीटी ते मांडवा आणिबेलापूर ते एलिफंटा हे प्रवासी जल वाहतूक मार्गावर वॉटर टॅक्सी आहेत. तर बेलापूर ते वाशी फ्लेमिंगो साईटसिईंग बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे मार्ग देखील लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com