बीओटी तत्त्वावर प्रवाशी शेड बांधणार

बीओटी तत्त्वावर प्रवाशी शेड बांधणार

20 किलोमीटर परिसरात सुमारे 1390 बसथांबे

नाशिक । फारूक पठाण Nashik

मागील अनेक वर्षापासून नाशिककरांना असलेली महानगरपालिकेच्या बससेवेची ( NMC Bus Services ) प्रतीक्षा मागच्या आठवड्यात संपली. मोठा गाजावाजा करून बससेवा सुरू झाली, मात्र आठ दिवस झाले तरी 50 पैकी 28 बसेसच रस्त्यावर धावत आहे. मात्र महापालिकेचे भविष्यासाठी भलेमोठे नियोजन असून यासाठी काम देखील सुरु झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहर व लगतच्या 20 किलोमीटर परिसरात जवळपास 1 हजार 390 बसथांबे असून त्या बसथांब्यावर सध्या 160 इतके प्रवाशी निवारा शेड उपलब्ध आहेत. तर 350 प्रवाशी शेड पुर्णपणे नव्याने बीओटी तत्वावर बांधण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. उर्वरीत 880 बस थांब्यावर पोल लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या पोलवर पाटी राहणार असून त्या पाटीवर बसथांब्यांचे नांव व त्या मार्गावरुन जाणार्‍या फेर्‍यांचे मार्ग क्रमांक दर्शीविले जाणार आहेत.

भविष्यात जास्तीत जास्त थांब्यावर शेड बांंधण्याचे देखील नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. नाशिक महापालिकेच्या बससेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या दिवशी सुमारे 20 हजार प्रवाशांनी लाभ घेतला होता, तर आतापर्यंत सुमारे 60 हजारपेक्षा अधिक प्रवाशांनी मनपाच्या बससेवेचा लाभ घेतला आहे.

बुधवारच्या दिवशी 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त उत्पन्न मनपाच्या सिटी लींकच्या गल्ल्यात जमा झाला होते. सध्या नाशिक शहरातील 9 मार्गावर एकूण 28 बसेस धावत आहेत. आगामी काही दिवसात यात वाढ होऊन त्याचा आकडा 50 पर्यंत जाणार आहे. तर भविष्यात 250 बसगाड्या शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत.

अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन बस व त्याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे घरी बसल्यावरही प्रवाशी अ‍ॅपद्वारे तिकीट बुकींग करुन रक्कम अदा करु शकतो, यामुळे तरुणांना देखील या नवीन कोर्‍या बसेसचे आकर्षण आहे. 8 जुलै 2021 रोजी मनपाकडून बससेवा सुरू करण्यात आली. शहरातील सध्या नऊ मार्गावर बसेस धावत असून आजच्या दिवशी 5 हजार 698 प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला तर 1 लाख 20 हजार 985 रुपयांचे उत्पन्न मनपाला मिळाले आहे. सरासरी दिड लाख रुपये रोजचे उत्पन्न मिळणे अपेक्षीत आहे. आठवड्यातील सोमवार व मंगळवारी 1 लाख 60 हजार पेक्षा जास्त उत्पन्न मिळाले होते.

विना तिकिटासाठी दंड

प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळूण आल्यास मार्ग तपासणी पथकाद्वारे दंड वसूल करण्यात येणार आहे. हा दंड 300 रुपये त्यासोबत 54 रुपये जीएसटी असा आहे. तसेच प्रवाशाकडून बसच्या संपूर्ण मार्गचे भांडे देखील वसूल केले जाणार आहे.

असे आहेत तिकीट दर

दोन किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रौढ व्यक्तीला दहा रुपये तर लहान मुलांना पाच रुपये याप्रमाणे बस भाडे आकारणी आहे. तर दोन ते चार किलोमीटरपर्यंत 15 व 10, चार ते सहा किलोमीटर पर्यंत 20 व 10, सहा ते आठ किलोमीटर पर्यंत 25 व 15, आठ ते दहा किलोमीटर पर्यंत 25 व 15 व 10 ते 12 किलोमीटर पर्यंत 30 व दहा ते पंधरा रुपये.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com