
दिल्ली | Delhi
नेपाळावर (Nepal) मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशीच संक्रांतच ओढावली आहे. कारण नेपाळमध्ये एक मोठा विमान अपघात (Plane Crash) झाला आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल ३६ प्रवाशांचे मृतदेह हाती (36 dead bodies recovered) लागले आहेत.
या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. येती एअरलाईन्स एअरक्राफ्ट या कंपनीचे हे विमान पोखराच्या आंतरराष्ट्रीय विमातळावर अपघातग्रस्त झाले. बचाव कार्य करत असताना आतापर्यंत ३६ मृतदेह मिळाले आहेत. दुर्घटनाग्रस्त प्रवासी विमान राजधानी काठमांडूहून (Kathmandu) पोखराला जात होते.
विमानात ५३ नेपाळमधील, पाच भारतीय, चार रशियाचे, एक आयरिश, दोन कोरियन आणि अर्जेंटिना आणि फ्रेंचमधील एका एका प्रवाशाचा समावेश असल्याची माहिती स्थानिक विमानतळ प्रशासनानं दिली आहे.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान प्रचंड आणि गृहमंत्री रवी लामिछाने थेट काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरील नियंत्रण कक्षात पोहोचले. सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान नेपाळचे पोखरा विमानतळ अपघातांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात होते. यापूर्वी येथे अनेक विमान अपघात झाले आहेत. आकडेवारीबाबत सांगायचे झाले तर गेल्या ३० वर्षांत पोखर-जोमसुम मार्गावर सात विमानांचे अपघात झाले आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्यातच तारा एअरलाइन्सचे विमान कोसळले होते, ज्या अपघातात क्रू मेंबर्ससह सर्व २२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये भारतीयांचा चार जणांचा समावेश होता. पोखरा शहरातून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हिमालयाच्या डोंगराळ भागात कोसळलेल्या तारा एअरच्या विमानाचे अवशेष ( Nepal plane crash ) सापडले होते.