अस्ताव्यस्त वाहन पार्किंगमुळे त्र्यंबककर हैराण

अस्ताव्यस्त वाहन पार्किंगमुळे त्र्यंबककर हैराण

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

त्र्यंबकेश्वर ( Trimbmbakeshwar ) येथे आद्य ज्योतिर्लिंग असल्याने 12 महिने भाविकांसह खासगी वाहनांची मोठी गर्दी असते. यामुळे शहरात जागोजागी अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने पार्किंग ( Parking )केलेली दिसतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन स्थानिकांसह दर्शन घेऊन शहराबाहेर पडणार्‍या भाविकांना तासन्तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच काही वर्षांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून अजूनही त्र्यंबकमध्ये वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची सोय नसल्याने त्र्यंबक नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर भाविक नाराजी व्यक्त करत आहेत.

देशभरातून दर्शनासाठी भाविक स्वतःच्या वाहनांनी त्र्यंबकेश्वरला येत असल्याने शहरात दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. या वाहनधारकांकडून वाहनतळावर प्रवेश फी म्हणून मोठ्या बसचालकांकडून 120, मिनी बस 70, कार-जीप 50 याप्रमाणे पैसे आकारले जातात. परंतु वाहन त्र्यंबक शहरात आल्यावर वाहनचालक पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने कधी रस्त्याच्या कडेला तर कधी नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्किंग करतात. त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो.

शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक बेट विकसित करण्यात आले आहे. मात्र बेशिस्त पार्किंग आणि बेजबाबदार वाहतुकीमुळे दिवसभरात दर अर्ध्या तासाला वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे किमान पुढचा अर्धा तास वाहनांची गर्दी दूर होत नाही. वाहतूक बेट असलेल्या सर्कलच्या बाजूंनी वाहने उभी केली जातात. याशिवाय बसस्थानक आणि जुन्या जकात नाक्याच्या बाजूने समोरासमोर वाहने येऊन चक्का जामसारखी परिस्थिती निर्माण होते. तर कुशावर्त चौक, शिवाजी चौक, गजानन महाराज संस्थान परिसर या भागातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना वाट मोकळी करताना चांगलीच कसरत करावी लागते.

तसेच त्र्यंबक शहरात एक प्रशस्त वाहनतळाची जागा असून त्या ठिकाणी सध्या पाच कोटी रुपये खर्च करून बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. त्यासोबतच नगरपरिषदेने आणखी 50 लाख रुपये खर्च करून निवृत्तिनाथ मंदिराकडे वाहनतळ विकसित केले आहे. परंतु इतके असूनही शहरात पार्किंगची समस्या कायम आहे. त्यामुळे आगामी कुंभमेळ्याअगोदर येथील स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन पार्किंगच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

त्र्यंबक शहरातील पार्किंगबाबत नगरपरिषदेचे ठराव झाले असून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्या पत्रास कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. तर नगरपरिषदेकडे कर्मचारी वर्गदेखील पुरेसा नाही. तसेच आगामी कुंभमेळ्यासाठी पार्किंगची जागा आरक्षित झाली असून कुंभमेळ्याच्या जिल्हा नियोजन समितीतून पार्किंगसाठी नियोजन करण्यात येईल.

संजय जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबक नगरपरिषद

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com