जि. प. कडून पंचायत राज समितीलाही टोलवा-टोलवी

जि. प. कडून पंचायत राज समितीलाही टोलवा-टोलवी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रशासनाने पंचायत राज समितीलाही (Panchayat Raj Samiti) टोलवा टोलवी करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अखेर ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव व विधिमंडळ सचिवांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्याची वेळ विधिमंडळ समितीवर आली आहे...

सामान्यांच्या प्रश्नांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव सामान्यांना रोजच येत असतो. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी विधानसभा अतारांकित प्रश्न उपस्थित करून मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील समाज मंदिर, घरकूल व शौचालय गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती.

त्यानंतर २४ सप्टेंबरला आलेल्या पंचायत राज समिती दौऱ्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन याबाबत कार्यवाही करून अहवाल मागवला होता. मात्र, याबाबत जिल्हा परिषदेने नोव्हेंबर महिना उजडूनही उत्तर दिले नाही.

यामुळे संतप्त झालेल्या विधिमंडळ समितीने ८ नोव्हेंबरला जिल्हा परिषदेस पत्र पाठवून याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल न दिल्यास ग्रामविकास विभागाकडे तक्रार करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

टोकडे येथील ग्रामपंचायतीत (Tokade Gram Panchayat) घरकूल, शौचालय व समाज मंदिर कामाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रार करण्यात आलेल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषदेकडून समाधान न झाल्याने संबंधितांनी सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी विधिमंडळ अधिवेशनात हा तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर त्याचे अतारांकित प्रश्नात रुपांतर झाले.

याविषयी विधिमंडळ सचिवालयाने जिल्हा परिषदेकडून कार्यवाही करून त्याचा अहवाला मागवला. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने काहीही उत्तर दिले नाही. यामुळे अखेर विधिमंडळ सचिव व ग्रामविकास मंत्रालयाच्या अप्पर सचिवांकडे तक्रार करण्याचा इशाराच पत्रात देण्यात आला आहे. विलंब झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com