Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअमाप वापर टाळा : ऑक्सिजनचे प्रमाण ९४ पेक्षा कमी असेल तरच रेमडेसिव्हिर

अमाप वापर टाळा : ऑक्सिजनचे प्रमाण ९४ पेक्षा कमी असेल तरच रेमडेसिव्हिर

औरंगाबाद

रेमडेसिव्हिरने मृत्यू दर घटल्याचा कोणताही वैद्यकीय पुरावा जगभरात नोंदवला गेला नसला तरी त्याचा वापर अमाप होत आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार तर त्याचा निम्मा गैरवापर होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन ९४ पेक्षा कमी असेल आणि रुग्ण व्याधीग्रस्त असेल तरच रेमडेसिव्हिर देण्याची पुण्यातील नियमावली सर्वत्र पाळण्याची गरज तज्ज्ञांनी नोंदवली आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्सिजन थेरपी व स्टिरॉईडसचा वापर रेमडेसिव्हिरपेक्षा जास्त शाश्वत असल्याचेही समोर येत आहे.

- Advertisement -

अलीकडे अनेक रुग्ण पॉझिटिव्ह येताच, कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय सिटी स्कॅन करून घेतात आणि ‘रेमडेसिव्हिर’देखील स्वतःच घेऊन येतात. मग रेमडेसिव्हिर देण्यासाठी डॉक्टरांना आग्रह केला जातो आणि डॉक्टरही दबावाखाली इच्छा असो किंवा नसो, गरज असो किंवा नसो, रेमडेसिव्हिर देऊन मोकळे होतात. एवढेच नव्हे तर अॅलोपॅथीच्या डॉक्टरला आयुर्वेदाची किंवा होमिओपॅथीची औषधे देण्यासाठीही अजब गळ घातली जाते, तर दुसरीकडे दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टरांकडूनही सर्रास रेमडेसिव्हिरसारख्या औषधांचा व सिटी स्कॅनचा वापर केला जात असल्याचेही समोर येत आहे.

रेमडेसिव्हिरचा गंभीर तुटवडा राज्यात निर्माण झाला आहे आणि या औषधाचे ब्लॅक मार्केटिंग सुरू झाल्याचे चित्र गडद होत आहे. मात्र मुळात प्रत्येक कोविड रुग्णाला रेमडेसिव्हिरची गरज नाही, असे स्पष्ट करताना शहरातील अतीव दक्षता तज्ज्ञ डॉ. आनंद निकाळजे म्हणाले, ज्या कोविड रुग्णांचा ऑक्सिजन ९४ पेक्षा कमी झाला असेल आणि सातत्याने कमी होत असल्याचे स्पष्ट होत असेल तरच अशा रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्याचा विचार करता येऊ शकतो आणि अशा कोविड रुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांपेक्षा नक्कीच जास्त नाही. रेमडेसिव्हिरचा गंभीर तुटवडा व अनिर्बंध वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन घटला तरच रेमडेसिव्हिरचा वापर करण्याचा पुण्यातील डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे आणि या नियमावलीचा वापर संपूर्ण राज्यात होणे अतिशय गरजेचे आहे.

कोविडचे निदान झाल्यावर पहिल्या सात ते आठ दिवसांत आणि अर्थातच कोमॉर्बिड व ऑक्सिजन कमी असेल तरच रेम्डेसिविरचा खरा उपयोग होतो. आणखी महत्त्वाचे म्हणजे रेमडेसिव्हिर हे काही ‘मॅजिक मेडिसिन’ नाही आणि या औषधामुळे मृत्यू कमी झाल्याचे सिद्ध झालेले नाही, असे फिजिशियन व अतीव दक्षता तज्ज्ञ डॉ. आनंद देशमुख यांनी ‘देशदूत’च्या प्रतिनिधीला सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या