ऑक्सिजन गळती दुर्घटनेचा अहवाल शासनाला सादर

ऑक्सिजन गळती दुर्घटनेचा अहवाल शासनाला सादर

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील प्लांटमध्ये ऑक्सिजन भरताना गळती होऊन झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे.

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये टँकरद्वारे ऑक्सिजन भरताना गळती होऊन व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली होती. समितीने तांत्रिक बाबींची चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरची दुर्घटना ही अपघात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढल्याचे समजते.

ऑक्सिजन प्लान्टसारख्या महत्त्वाच्या बाबींची देखभाल करताना कंपनीचे तंत्रज्ञ चोवीस तास हजर ठेवण्याचा करार करणे गरजेचे होते, परंतु करारात चोवीस तास तंत्रज्ञ हजर ठेवण्याची अट टाकली नव्हती.

ऑक्सिजन प्लान्टसंदर्भात काही तक्रार असल्यास 24 तासात निराकरण करावे, असे करारात नमूद केले, मात्र दुर्घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी कंपनीचे अधिकारी हजर झाल्याने हलगर्जीपणा समोर आल्याची बाब नमूद केल्याचे समजते. तांत्रिक बाबींची तपासणी करताना चौकशी समितीने ऑक्सिजन टँकसाठी वापरलेले साहित्य गुणवत्तापूर्ण असल्याचा निष्कर्ष काढल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com