आयपीएल लिलावात यंदा १ हजार ९७ खेळाडू; कोणत्या देशाचे किती खेळाडू पाहा इथे

आयपीएल लिलावात यंदा १ हजार ९७ खेळाडू; कोणत्या देशाचे किती खेळाडू पाहा इथे

चेन्नई | आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नईत होणार आहे. या लिलावात आपलं नशीब अजमावण्यासाठी तब्बल १ हजार ९७ खेळाडू रिंगणात आहेत. यंदाच्या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू रांगेत आहेत. आयपीएलने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे...

भारतात कोरोना विषाणूचा कहर नियंत्रणात येत असल्यामुळे आयपीएलचे आयोजन भारतात केलं जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बांगलादेश संघाचा अष्टपैलू शाकिब अल हसन आपल्या निलंबनाचा कालावधी संपवून पुनरागमन करणार आहे.

शिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लिलावाच्या यादीत आपल्या नावाची नोंदणी केली आहे. त्याची बेस प्राईस २० लाख इतकी आहे.

यंदाच्या लिलावात एरन फिंच , ग्लेन मॅक्सवेल , स्टीव्ह स्मीथ , क्रिस मॉरिस यासारख्या खेळाडूंची नावे देखील चर्चेत आहेत. स्मिथला लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने आपल्या संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. तर फिंचला आरसीबीने वगळले होते.

तसेच २०२० आयपीएलमध्ये आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला मॅक्स्वेलही यंदाच्या लिलावाचे प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय आणि टी २० मालिकेत त्याने चमकदार कामगिरीच्या जोरावर आपली छाप पाडली होती.

जानेवारीत सर्व आठही संघांनी आपल्या संघातील रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे पाठवली आहे. पंजाबने ९, चेन्नईने ६ तर आरसीबीने सर्वाधिक १० खेळाडूंना आपल्या संघातून वगळून बाहेर केले आहे. तर सनराईझर्स हैदराबादने आणि मुंबई इंडियन्सनेसर्वाधिक खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवलं आहे.

चला तर मग पाहूया, कोणत्या देशाचे किती खेळाडू आहेत ?

यादीत ऑस्ट्रेलियाचे ४२, वेस्ट इंडिजचे २७, दक्षिण आफ्रिकेचे ३८ खेळाडू आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या २१ खेळाडूंसह एकूण २०७ खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. तर सहयोगी देशांच्या २७ खेळाडूंनी आपली नोंदणी केलेली आहे.

याशिवाय ज्या खेळाडूंनी आपल्या संघाचे अजून प्रातिनिधीत्व केलेले नाही असे एकूण ८६३ खेळाडू रिंगणात आहेत. यामध्ये ७४३ भारतीय आणि ६८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर अजूनपर्यंत भारतीय संघाचे प्रातिनिधीत्व न केलेल्या ५० खेळाडूंचा लिलावात सहभाग असणार आहे.

प्रत्येक संघामध्ये एकूण २५ खेळाडू असतील तर् लिलावामध्ये एकूण ६३ खेळाडूंची खरेदी होईल. तर यामध्ये २२ विदेशी खेळाडू असू शकतील. लिलाव प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दुपारी ३ वाजता करण्यात येईल.

सलिल परांजपे देशदूत नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com