
नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik
नवीन नाशिक परिसरातील रुग्णांसाठी केवळ फक्त बाह्यरुग्ण तपासणी तसेच महिला प्रसूतीगृह आहे. या ठिकाणी इतर व्याधींच्या उपचारांसाठी दाखल करून घेण्याची कुठलीही सुविधा नसल्याने नवीन नाशिककरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हायचे ठरलेच तर बिटको किंवा जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नाही.
कामगारांची वसाहत म्हणून नवीन नाशिक परिसराची ओळख आहे. या ठिकाणी मध्यमवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच पंडित नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुल योजनेचा समावेश आहे. सदरहू संपूर्ण परिसराची लोकसंख्या बघता सुमारे अडीच ते तीन लाख लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या ठिकाणी असलेल्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात महिला प्रसूतीगृहात सुमारे 50 खाटांची व्यवस्था आहे.
यासोबतच येथे फक्त बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. नवीन नाशिक शहरी आरोग्य केंद्र, हेडगेवारनगर येथील आरोग्य केंद्र, महालक्ष्मीनगर व पिंपळगाव खांब येथे आरोग्य केंद्र आहे. त्या ठिकाणीदेखील बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. यासोबतच सोनोग्राफी व एक्स-रेदेखील नाममात्र दरात काढून दिला जातो. नवीन नाशकात बाह्यरुग्ण तपासणीकरता सोय उपलब्ध असली तरी गंभीर रुग्णाला अॅडमिट करण्याची सोय होणे गरजेचे आहे.
अचानक चौक येथील नवीन नाशिक शहरी आरोग्य केंद्र येथे नागरिकांना सुविधा दिल्या जातात. मात्र या ठिकाणी कोविडचा बूस्टर डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांना माघारी जावे लागत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी लसचा तत्काळ पुरवठा करावा.
राहुल गणोरे
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर डॉक्टरांचे नाव, त्यांची बाह्यरुग्ण तपासणी वेळ टाकावी जेणेकरून येणार्या रुग्णाला त्याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ रुग्णालय येथे रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी.
संतोष काकडे पाटील