शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग(Department of Tourism, Government of Maharashtra ) आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी( Shivneri Fort) येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha )यांनी गुरुवारी येथे दिली.

या महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती असणार आहे.

पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या सोहळ्यानिमित्त एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील, असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले असल्याचे लोढा म्हणाले.

किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदवी स्वराज्य महोत्सव( 'Hindavi Swarajya Mahotsav-2023')

१८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.६:३० वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ उदघाटन होणार असून सायं. ७ ते रात्री १० वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम होणार आहे. १९ फेब्रुवारीला स.९ ते ११ वा.किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा होणार असून दु.३ ते ५ वाजता शिववंदना होईल. सायं. ६:१५ ते ७ वा. महाशिवआरती कार्यक्रम होणार आहे सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम होईल. तर २० फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.७ ते रात्री १० वा. जाणता राजा कार्यक्रम आहे.विविध बचतगटांची उत्पादने आणि खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com