धोकादायक ईमारतींंबाबत कारवाईचे आदेश

धोकादायक ईमारतींंबाबत कारवाईचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC )वतीने शहर परिसरातील धोकादायक इमारती (Dangerous buildings) तसेच अतिधोकादायक इमारतींना पावसाळ्यापूर्वी नोटिसा बजावण्यात येत आहेत. एकूण 1077 पैकी आजपर्यंत 786 लोकांना प्रत्यक्ष नोटिसा देण्यात आल्या आहे. दरम्यान, ही पहिली नोटीस बजावण्यात आली असून एक महिन्यानंतर दुसरी नोटीस देऊन थेट कारवाई होणार आहे.

यामुळे ज्या ठिकाणी धोकादायक इमारती आहेत, त्यांनी स्वतःहून याबाबत कारवाई करावी करून घर रिकामे करावे अन्यथा वीज मीटरपासून पाण्याचे नळकनेक्शन देखील कापण्यात येणार आहे. तसेच पोलीस यंत्रणेद्वारे अशा घरांना रिकामे करण्याची कारवाई होणार आहे.

दर पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्यावतीने शहर परिसरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती, वाडे तसेच घरांना नोटिसा बजावण्याची कारवाई होते. मात्र यंदा महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे पहिल्या नोटीसनंतर एक महिन्याच्या काळानंतर दुसरी नोटीस बजावण्यात येणार आहे.

त्यानंतर देखील घरे रिकामे न झाल्यास जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन महापालिका तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई होणार आहे. तसेच संबंधितांची यादी वीज वितरण कंपनीला देऊन त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यानंतर महापालिकेच्या वतीने देण्यात आलेले पाण्याचे नळ कनेक्शनदेखील कापण्यात येणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना दिलेल्या अधिकारांतर्गत जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलिस असे धोकादायक घरे, वाडे व इमारतींना रिकामे करणार आहे.

जुना व गंभीर प्रश्न मार्गी लागणार

नाशिक शहर परसरात विशेषता जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी देखील झाली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भाडेकरी व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही. मात्र महापालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्न मार्गी लागणार आहे.

दरवर्षी धोकादायक इमारतींमुळे जीवित व वित्तहानी होते. यामुळे आता कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार विभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.यानुसार दुसर्‍या नोटीस नंतर वीज मीटर काढणे तसेच पाणी कनेक्शन बंद करणे याचे अधिकार विभागीय अधिकार्‍यांना मिळाले आहेत. त्यानुसार कारवाई होणार.

संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता, मनपा नगर नियोजन

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com