Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशेतकऱ्यांचे आज उपोषण

शेतकऱ्यांचे आज उपोषण

नवी दिल्ली। वृत्तसंस्था

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा रविवारी 18 दिवस होता.शेतकर्‍यांनी आंदोलन तीव्र केले असून सोमवारी दिल्ली बॉर्डरवर सर्व शेतकरी नेते सकाळी 8 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. याशिवाय सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर देशव्यापी आंदोलन केले जाईल.

- Advertisement -

भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, गाझियाबाद बॉर्डरवर काही चुकीची तत्वे पोस्टर घेऊन आंदोलनात सामील झाले होते, त्यांना आम्ही हटवले आहे. यापुढे असा लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.

दरम्यान, शेतकर्‍यांच्या या आंदोलनात प्रत्येक राजकीय पक्ष आपला झेंडा सर्वात उंच ठेवू इच्छित आहेत. यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. इतकेच नाही, तर अन्नदात्यांच्या हे आंदोलन सुरू असताना देशातील प्रसिद्ध व्यक्ती देखील या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहेत. शेतकर्‍यांचे हे आंदोलन अधिकच उग्र होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि कृषी राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक घेतली.

केंद्र सरकारला लवकरात लवकर शेतकर्‍यांशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे. जर शेतकरी दोन पावले पुढे सरकले, तर सरकार देखील दोन पावले पुढे यायला तयार आहे. नाहीतर, या लोकांनी 60 वर्षे केवळ राजकारण केले होते आणि आज देखील हे शेतकर्‍यांचा वापर करून पुढे जाऊ पाहत आहेत, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी म्हटले. आम्ही शेतकरी आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या संपर्कात आहोत आणि मला वाटतं की लवकरच पुढील बैठक होईल, असेही ते पुढे म्हणाले.

केजरीवाल करणार उपवास

शेतकर्‍यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवसाचा उपवास करणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी आआपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासीयांनाही उद्याचा एक दिवस शेतकर्‍यांसाठी उपवास करण्याचें आवाहन केलें आहे. आपण त्यांच्यासोबत जाऊ शकत नसलो तरीही उपवास करुन आपण त्यांच्या मागण्या मान्य होतील यासाठी प्रार्थना करु असेंही केजरीवाल यांनीही म्हटलें आहे.

पंजाबच्या उपमहानिरीक्षकांचा राजीनामा

पंजाबचे निलंबित पोलिस उपमहानिरीक्षक (तुरुंग) लखविंदरसिंह यांनी अकाली सेवानिवृत्ती मागितली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकरी बंधुंसोबत मी असल्याचे सांगत लखविंदरसिंह जाखड यांनी गृह खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून कळवले आहे.

दिल्लीत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी जंतर-मंतर येथे आयोजित आंदोलनात भाग घेतला. तेथे काँग्रेस पक्षाचे खासदार आंदोलन करत होते. माझे सहकारी येथे शेतकर्‍यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती करत आहेत, असे शशी थरूर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या