दिवाळी शिधायोजने बाबत दानवेंचा गंभीर आरोप

दिवाळी शिधायोजने बाबत दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सामान्य जनतेची दिवाळी ( Diwali Festival - 2022 ) गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी शिधा योजनेच्या (Diwali Ration Scheme) निविदा प्रक्रियेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Leader of Opposition in Legislative Council Ambadas Danve) यांनी गुरुवारी केला.

मंत्रिमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पॅकेजसाठी एक रुपयाही न घेता हे पॅकेज मोफत द्यावे आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे, अशी मागणी दानवे यांनी केली.

४ ऑक्टोबरच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोरगरीब जनतेला रेशन दुकानांच्या माध्यमातून दिवाळी फूड किट देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या योजनेसाठी एनसीडीइएक्स ई मार्केट लिमिटेडच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२२ ला परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले. ३ ऑक्टोबर २०२२ पासून निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्यापूर्वी ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रियेसाठी अत्यंत घाई-गडबडीने आणि कमी वेळात निविदा प्रक्रिया का पार पाडण्यात आली? कुणाच्या फायद्यासाठी हे केले जात आहे? असे प्रश्न दानवे यांनी या पत्रात उपस्थित केले आहेत. एखाद्या एजन्सीच्या फायद्यासाठी खुली स्पर्धा न घेता अवघ्या ३ दिवसांत मंत्रिमंडळ निर्णय होण्यापूर्वी ही निविदा काढण्यात आली असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com